जळगाव: जळगाव जिल्ह्यातून मन हेलावणारी घटना समोर आली आहे. काम देण्याचे आमिष दाखवून दोन महिलांनी एका अल्पवयीन मुलीला नाशिकला नेले आणि त्यानंतर तिची कोल्हापूर येथे दोन लाख रुपयांना विक्री केली. या महिलांनी पीडित मुलीचे जबरदस्तीने लग्न लावून दिले. एवढ्यावरच न थांबता तिचा गर्भपातही करण्यात आला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ही घटना पीडित मुलगी जळगावमध्ये परत आल्यानंतर उघडकीस आली. मुलीच्या कुटुंबीयांनी हा प्रकार समजून घेताच घरात हळहळ व संतापाचे वातावरण निर्माण झाले. मुलीला विकल्याच्या मानसिक धक्क्यामुळे तिच्या वडिलांनी भैय्या रामदास पाटील यांनी आत्महत्या केली.
हेही वाचा: कार्ला येथील एकविरा आईच्या दर्शनासाठी अंग प्रदर्शन करणाऱ्या कपड्यांवर बंदी
या घटनेनंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांवर संबंधित महिलांकडून आणि लग्न लावून देणाऱ्या कुटुंबाकडून धमक्या देण्यात येत आहेत. पैशांची मागणीही करण्यात येत असून या प्रकरणात पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतरही पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भैय्या पाटील यांच्या भावाने भरत पाटील यांनी केला आहे.
मयत भैय्या पाटील यांचा मुलगा धीरज पाटील आणि मित्र ईश्वर तायडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, नोकरीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींची विक्री करणारे रॅकेट जिल्ह्यात सक्रिय झाले असल्याची भीती वाटते. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात प्रचंड संताप व खळबळ माजली आहे.