एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणानंतर राज्यात उठलेलं विद्यार्थ्यांचं वादळ पाहता राज्य सरकारने अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणानंतर वादग्रस्त ठरलेले एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांची अखेर बदली करण्यात आली आहे. मागच्या महिन्यात नवी मुंबईत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी MPSC चे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळ फासलं होतं.
MPSC चे अध्यक्ष आणि सचिव महेंद्र हरपाळकर यांचा राजीनामा घ्यावा अशी एमपीएससीच्या परीक्षार्थींची मागणी होती. अशातच पुण्यात विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या तीव्र आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणानंतर आयोगाच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
यानंतर विद्यार्थ्यांच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आयोगाच्या अध्यक्षांसह सचिवांच्या बदलीची मागणी केली होती. 2 ऑक्टोबरच्या पुण्यातील एमपीससीच्या विद्यार्थीं आंदोलनापूर्वी ही सकारत्मक चर्चा झाली होती. विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा दृढ करण्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून कठोर निर्णय घेतले जातील, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता.
त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी दिलेला शब्द पाळला आहे. त्यानुसार, सामान्य प्रशासन विभागाकडून परिपत्रक काढण्यात आलं आहे. यात एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना सचिव पदावरून कार्यमुक्त (Relieved) करण्यात आले असून त्यांची मूळ विभागात बदली करण्याचे आदेश राज्य शासनाने जारी केले आहेत.