Thursday, March 12, 2026 10:58:51 PM

Mumbai Record Breaking AQI: मुंबईचा 'गॅस चेंबर' होतोय का? मागील सात वर्षांतील प्रदूषणाचे सर्व रेकॉर्ड मोडले; 'हा' आकडा वाचून तुमची धडकी भरेल

वाढती बांधकामे, वाहनांचा धूर आणि हवामानातील बदलांमुळे स्मॉगचे संकट गंभीर बनले असून आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना विशेष काळजी घेण्याचा इशारा दिला आहे.

mumbai record breaking aqi मुंबईचा गॅस चेंबर होतोय का मागील सात वर्षांतील प्रदूषणाचे सर्व रेकॉर्ड मोडले हा आकडा वाचून तुमची धडकी भरेल

मुंबई: ज्या शहराच्या अथांग समुद्राच्या लाटा आणि मोकळी हवा मुंबईकरांना जगण्याचे बळ द्यायची, त्याच मुंबईला आता प्रदूषणाच्या काळवंडलेल्या धुरक्याने ग्रासले आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची हवा सध्या आरोग्यासाठी 'अतिधोकादायक' श्रेणीमध्ये पोहोचली असून, गेल्या सात वर्षांतील फेब्रुवारी महिन्यातील प्रदूषणाचे सर्व विक्रम यंदा मोडीत निघाले आहेत. शुक्रवारी मुंबईचा सरासरी हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 344 च्या भयावह पातळीवर पोहोचला. ही केवळ आकडेवारी नसून, मुंबईकरांच्या आरोग्यासोबत होत असलेला 'निष्काळजीपणा' आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

2020 ते 2026 या कालखंडाचा आढावा घेतल्यास एक विदारक वास्तव समोर येते. अवघ्या सहा-सात वर्षांपूर्वी, म्हणजेच 2020 मध्ये याच फेब्रुवारी महिन्यात मुंबईचा सरासरी AQI 91 इतका नोंदवला गेला होता, जो आरोग्यासाठी समाधानकारक मानला जातो. मात्र, यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात 10, 18 आणि 19 फेब्रुवारी हे केवळ तीन दिवस सोडले तर, उर्वरित संपूर्ण महिना प्रदूषणाचा आकडा 100 च्या पार राहिला आहे. विकासाच्या धावपळीत मुंबईने शुद्ध हवेचा अधिकार गमावला असून, जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत मुंबई आता थेट 157 व्या स्थानावर पोहचली आहे.

हेही वाचा: Mumbai Flyovers Condition: सावधान! मुंबईतील 'या' महत्त्वाच्या उड्डाणपुलाला आले अकाली वार्धक्य; गर्डरला तडे अन् गंजलेले लोखंड, महापालिकेचा मोठा निष्काळजीपणा?

गेल्या तीन दिवसांपासून दक्षिण मुंबईसह उपनगरांमध्ये पहाटेच्या वेळी 'धुके' नसून विषारी 'धुरक्याचे' (Smog) साम्राज्य पाहायला मिळत आहे. मुंबईची नवीन ओळख बनलेला कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सी-लिंकवर दृश्यमानता (Visibility) इतकी कमी झाली आहे की, वाहनचालकांना दिवसाढवळ्या कसरत करावी लागत आहे. चांदिवली (238), मालाड पश्चिम (240) आणि बीकेसी (234) यांसारख्या भागात हवेची गुणवत्ता 'खराब' श्रेणीत आहे, तर नवी मुंबईने 267 या 'चिंताजनक' आकड्याला गवसणी घातली आहे. हे चित्र पाहता मुंबई आता 'गॅस चेंबर' बनतेय की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.

वाढत्या आर्द्रतेमुळे उकाड्यात भर पडली असून, हवेचा वेग मंदावल्याने प्रदूषणाचे कण जमिनीलगतच स्थिरावले आहेत. यामुळे नागरिकांना डोकेदुखी, अस्वस्थता आणि दम्याचा त्रास जाणवू लागला आहे. सध्याचा 150 ते 300 च्या दरम्यान असलेला AQI हा विशेषतः श्वसनाचे विकार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि लहान मुलांसाठी 'जीवघेणा' ठरू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

मुंबईत ठिकठिकाणी सुरू असलेली बांधकामे, मेट्रोची कामे, वाहनांचा अलोट धूर आणि बदलणारे हवामान ही या प्रदूषणामागची प्रमुख 'त्रिसूत्री' मानली जात आहे. मुंबई महानगरपालिकेने (BMC) धूळ नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असली, तरी त्यांची अंमलबजावणी मात्र 'कागदावरच' असल्याचे दिसते. प्रशासन डोळेझाक करत असल्याने आणि विकासकांकडून नियमांची पायमल्ली होत असल्याने सर्वसामान्यांचा श्वास मात्र कोंडला जात आहे. यामुळे प्रशासनाने आता कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

आरोग्य तज्ज्ञांनी मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवेची गुणवत्ता सुधारेपर्यंत सकाळी लवकर फिरणे टाळावे आणि घराबाहेर पडताना अनिवार्यपणे एन-95 (N-95) मास्कचा वापर करावा. तापमानात आणखी वाढ झाल्यास आणि वाऱ्याचा वेग मंदावल्यास ही गुदमरून टाकणारी स्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे. मुंबईला पुन्हा 'मोकळा श्वास' मिळवून द्यायचा असेल, तर केवळ धोरणे आखून चालणार नाही, तर त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी ही काळाची गरज बनली आहे.

हेही वाचा: Pakistan Airstrikes on Afghanistan: रात्रीच्या अंधारात 'एअर स्ट्राईक'; पाकिस्तानच्या विमानांचा अफगाणिस्तानच्या सीमेवर बॉम्बवर्षाव, 17 जणांचा मृत्यू?


सम्बन्धित सामग्री