Tuesday, February 17, 2026 08:22:49 AM

Cab Driver Arrested: अवघ्या 400 मीटरसाठी 18 हजार रुपये भाडं; मुंबई पोलिसांचा दणका; सोशल मीडियावरील पोस्टनंतर 'तो' टॅक्सी चालक अटकेत

सोशल मीडियावरील पोस्टनंतर उघड झालेल्या या घटनेने पर्यटक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

cab driver arrested अवघ्या 400 मीटरसाठी 18 हजार रुपये भाडं मुंबई पोलिसांचा दणका सोशल मीडियावरील पोस्टनंतर तो टॅक्सी चालक अटकेत

मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अवघ्या 400 मीटर अंतरावर असलेल्या पंचतारांकित हॉटेलपर्यंतच्या प्रवासासाठी अमेरिकन नागरिक महिलेकडून तब्बल 18000 रुपये आकारल्याप्रकरणी टॅक्सी चालकाला अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टनंतर हा प्रकार उघडकीस आला असून, मुंबई पोलिसांनी तातडीने कारवाई केली.

पोलिसांनी देशराज यादव (वय 50) या टॅक्सी चालकाला फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली आहे. ही महिला 12 जानेवारी रोजी अमेरिकेतून मुंबईत आली होती. विमानतळाजवळील अंधेरी (पूर्व) येथील हॉटेलपर्यंत जाण्यासाठी तिने टॅक्सी घेतली होती. मात्र चालकाने तिला 20 मिनिटे अंधेरी परिसरात फिरवून पुन्हा त्याच भागात आणले आणि केवळ 400 मीटर अंतरासाठी 18 हजार रुपये (सुमारे 200 डॉलर) भाडे घेतल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात 27 जानेवारी रोजी Suo Motu गुन्हा दाखल करण्यात आला आणि अवघ्या तीन तासांत आरोपीला अटक करण्यात आली. संबंधित महिलेने 26 जानेवारी रोजी X  या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत हा प्रकार उघड केला होता. ‘अर्जेंटिना आरियानो’ असे नाव असलेल्या या महिलेने पोस्टमध्ये मुंबईत उतरल्यावर टॅक्सीने हिल्टन हॉटेलकडे जात असताना चालकाने आणि आणखी एका व्यक्तीने तिला अज्ञात ठिकाणी नेले, 200 डॉलर घेतले आणि नंतर हॉटेलजवळ सोडल्याचा दावा केला होता. तिने टॅक्सीचा नोंदणी क्रमांकही पोस्टमध्ये शेअर केला होता. या पोस्टला एक लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले.

घटना उघडकीस आल्यानंतर जवळपास दोन आठवड्यांच्या विलंबानंतरही पोलिसांनी सोशल मीडियावरून मिळालेल्या वाहन क्रमांकाच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. या तपासावर पोलीस उपायुक्त (झोन VIII) मनीष कलवानिया यांच्या देखरेखीखाली पोलीस वरिष्ठ निरीक्षक मनोज चालके आणि त्यांच्या पथकाने काम केले.

हेही वाचा: Liquor Smuggling Case: रेल्वेतून दारू तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; मोठ्या प्रमाणात साठा आणि रोख रक्कम पोलिसांकडून जप्त

पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापनाकडून माहिती घेतली असता, संबंधित महिलेने 12 जानेवारी रोजी हॉटेलमध्ये चेक-इन करून दुसऱ्या दिवशी चेक-आउट केल्याचे, त्यानंतर पुण्याला प्रवास करून नंतर अमेरिकेत परतल्याचे निष्पन्न झाले. “आम्ही पीडितेचा जबाब नोंदवण्याचा प्रयत्न करत आहोत. तिने घटनेबाबत हॉटेल कर्मचाऱ्यांना माहिती दिली नव्हती,” असे मनोज चाळके यांनी सांगितले. पर्यटकांनी भाडेवाढीचा संशय आल्यास तात्काळ हॉटेल प्रशासन किंवा स्थानिक पोलिसांना कळवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, यादवचा कथित साथीदार शोधण्याचे काम सुरू असून, आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याची टॅक्सी जप्त करण्यात आली असून, त्याचा परवाना रद्द करण्यासाठी प्रकरण प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (RTO, Regional Transport Office) पाठवले जाणार आहे. त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, अलीकडच्या काळात अशा प्रकारच्या घटना वारंवार समोर येत आहेत. डिसेंबर 2024 मध्ये ऑस्ट्रेलियन एनआरआय व्यावसायिकाकडून 10 मिनिटांच्या प्रवासासाठी 2800 रुपये आकारल्याप्रकरणी टॅक्सी चालकाला अटक झाली होती. त्याच महिन्यात, मीटरवर 106 रुपये दाखवत असताना अमेरिकास्थित विद्यार्थ्याकडून 3500 रुपये लुटल्याच्या आरोपावरून एका रिक्षा चालकालाही अटक करण्यात आली होती. अशा घटनांमुळे मुंबईतील पर्यटन प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, पोलिसांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

हेही वाचा: Children Missing Case: मुंबई हादरली! गेल्या 36 तासांत 12 मुले बेपत्ता; पालकांमध्ये भीती


सम्बन्धित सामग्री