Saturday, February 14, 2026 12:21:31 PM

Santosh Dhuri: "मनसे कार्यकर्त्यांचा फक्त वापर..." संतोष धुरींनी आरोप करत सांगितलं मनसेच्या पराभवामागची 'इनसाईड' स्टोरी

राज - उद्धव ठाकरे एकत्र येऊनही मनसेला अपेक्षित यश न मिळाल्याने पक्षाचा केवळ ‘प्यादे’ म्हणून वापर झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

santosh dhuri quotमनसे कार्यकर्त्यांचा फक्त वापरquot संतोष धुरींनी आरोप करत सांगितलं मनसेच्या पराभवामागची इनसाईड स्टोरी

मुंबई: महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. मनसेला 'जय महाराष्ट्र' करत भाजपमध्ये प्रवेश केलेले आक्रमक नेते संतोष धुरी यांनी मनसेच्या कामगिरीवर आणि रणनीतीवर पहिला मोठा वार केला आहे. "मनसेची निवडणुकीत केवळ चेष्टा केली जात असून दुसऱ्यांना निवडून आणण्यासाठी या पक्षाचा वापर केला जात आहे," असा खळबळजनक आरोप धुरी यांनी केला आहे.

निवडणूक निकालांचे सविस्तर गणित मांडताना संतोष धुरी म्हणाले की, निवडणुकीपूर्वी मनसेच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विजयाचा खूप मोठा जल्लोष केला होता. मात्र, प्रत्यक्षात हाती आलेले निकाल पाहता मनसेची अक्षरशः 'चेष्टा' झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी एकट्या मनसेचे आठ नगरसेवक निवडून आले होते, पण आता 'राज-उद्धव' कुटुंब एकत्र येऊनही मनसेला केवळ सहा जागांवर समाधान मानावे लागले. ही बाब पक्षाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभी करणारी असल्याचे धुरी यांनी नमूद केले.

हेही वाचा: Municipal Corporation Election Result: काँग्रेस–वंचितच्या मदतीशिवाय सत्ता अशक्य? आकड्यांनी भाजप-शिवसेनेची नवी रणनीती

मनसे सोडून पक्षांतर करणाऱ्यांवर होणाऱ्या 'गद्दार' या टीकेलाही संतोष धुरी यांनी टीका केली. "जे लोक पक्ष सोडून बाहेर पडले, त्यांना तुम्ही गद्दार म्हणणार का? वास्तव तर असे आहे की, मनसेत असणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या अनेकांनी आधीच भाकीत केले होते की भाजपच विजयी होणार. मात्र, आमच्या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले," असे सांगत त्यांनी नेतृत्वावर निशाणा साधला.

वरळी मतदारसंघाचा उल्लेख करताना धुरी यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, "वरळीत मनसेची हक्काची एक जागाही जिंकता आली नाही. जाणीवपूर्वक शिवसेना ठाकरे गटाकडून तिथे दुसरा उमेदवार देण्यात आला. महायुती आणि महाविकास आघाडीच्या मोठ्या राजकारणात मनसेचा केवळ एक 'प्यादे' म्हणून वापर करून घेतला जात आहे." माहीम आणि दादर यांसारख्या मनसेच्या बालेकिल्ल्यांमध्ये पक्ष किती कमी फरकाने हरला किंवा मागे पडला, याचे गांभीर्याने आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले.

शेवटी धुरी यांनी कार्यकर्त्यांच्या परिस्थितीवर भाष्य करताना म्हटले की, "जागा वाटपाच्या वेळी मनसेने जो काही गोंधळ घातला, त्याचा थेट फायदा केवळ दुसऱ्या पक्षांना झाला. मनसेच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांचा वापर केवळ इतरांना सत्तेच्या खुर्चीवर बसवण्यासाठी केला जात आहे." या टीकेमुळे आता मनसेच्या गोटात मोठी खळबळ उडाली असून, पक्षांतर्गत वादाला पुन्हा तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा: Devendra Fadnavis: ठाकरेंना डिवचणाऱ्या राणेंचे मुख्यमंत्र्यांनी असे टोचले कान, म्हणाले "विजयाचा उत्सव साजरा करा पण ... "


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या