मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या 227 प्रभागांसाठी आज मतदान होत आहे. नियमानुसार मतदानापूर्वीचे 48 तास ‘मौन’ (सायलेन्स पिरियड) पाळणे बंधनकारक असल्याने मंगळवारी सायंकाळी 5.30 वाजता जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. मात्र, मैदानातील प्रचार थांबला असला तरी मुंबईतील घराघरांमध्ये असलेल्या स्मार्टफोनमध्ये प्रचाराचा धुरळा अद्याप उडत आहे. शहरातील गृहनिर्माण सोसायट्या, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांच्या व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर सध्या राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, छुप्या प्रचाराने जोर धरला आहे.
मुंबईतील सुमारे 1.03 कोटी मतदार आज जवळपास 1700 उमेदवारांचे भवितव्य ठरवत आहेत. आचारसंहितेमुळे उमेदवारांना जाहीर सभा किंवा रॅली काढता येत नसल्याने, त्यांनी आपला मोर्चा ‘फॅमिली’ आणि ‘सोसायटी’ ग्रुप्सकडे वळवला आहे. “आपल्या प्रभागाच्या विकासासाठी अमुक उमेदवारालाच निवडून द्या,” “मराठी अस्मितेसाठी मतदान करा,” अशा आशयाचे मेसेज मध्यरात्रीपर्यंत फॉरवर्ड होत आहेत. विशेष म्हणजे, ज्या ग्रुप्समध्ये मतभेद वाढू लागले आहेत, तिथे वाद टाळण्यासाठी अॅडमिन्सनी ‘ओन्ली अॅडमिन’ सेटिंगचा आधार घेतल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे.
हेही वाचा: Maharashtra Election 2026: मतदान केंद्रावर शाईऐवजी मार्करचा वापर, निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार उघडकीस
गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या मराठी आणि अमराठी मतदारांमध्ये यंदा मेसेजेसचे युद्ध रंगताना दिसत आहे. “मुंबई वाचवण्यासाठी मराठी माणसालाच मत द्या” अशा भावनिक आवाहनांना “विकासासाठी भाषिक राजकारण नको” अशा मेसेजेसनी प्रत्युत्तर दिले जात आहे. काही ठिकाणी “तिळगुळ घ्या, गोड बोला आणि मराठी उमेदवारालाच मत द्या” असे उपरोधिक संदेशही व्हायरल झाले आहेत. या डिजिटल ‘हमरी - तुमरी’मुळे सोसायट्यांच्या शांत वातावरणात राजकीय ठिणग्या पडताना दिसत आहेत.
निवडणूक आयोगाने SMS आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे प्रचारावर बंदी घातलेली असली, तरी ‘पीअर-टू-पीअर’ (एका व्यक्तीने दुसऱ्याला पाठवलेला संदेश) मेसेजिंगवर नियंत्रण मिळवणे यंत्रणेसाठी कठीण झाले आहे. कार्यकर्त्यांच्या या अतिउत्साहामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांनी ग्रुपमधून बाहेर पडणे पसंत केले आहे, तर काहींनी “आजच्या दिवशी राजकारण नको” असे फलकच सोसायटीच्या सूचना फलकावर लावले आहेत. आशियातील सर्वात श्रीमंत महापालिकेवर बृहन्मुंबई महानगरपालिका कोणाची सत्ता येणार, हे ठरवण्यापूर्वी मुंबईकर या डिजिटल प्रचाराला कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
आज सकाळी साडे सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून, सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत मुंबईकरांना आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. प्रशासनाने या निवडणुकीसाठी 28,000 हून अधिक पोलीस तैनात केले असून, सोशल मीडियावरील अफवांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. आजच्या मतदानानंतर उद्या, 16 जानेवारी रोजी मुंबईचा नवा ‘किंग’ कोण असेल, हे स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा: BMC Election 2026: आज चुकलात तर कायमचे...., ठाकरे बंधूंसाठी रश्मीताई मैदानात; थेट मुंबईकरांना आवाहन