BMC Election : रामदास कदमांचा घणाघात, अमित-आदित्य ठाकरेंचा पिल्लं म्हणून उल्लेख

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरळीत झालेल्या महायुतीच्या सभेत रामदास कदम यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

BMC Election : रामदास कदमांचा घणाघात, अमित-आदित्य ठाकरेंचा पिल्लं म्हणून उल्लेख

मुंबई: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, मुंबई महापालिकेच्या रणसंग्रामासाठी आज वरळीत महायुतीची भव्य प्रचारसभा पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी आपल्या आक्रमक शैलीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केला. कदम यांच्या फटकेबाजीमुळे वरळीतील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले.

आपल्या भाषणात रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर प्रश्नांची सरबत्ती केली. "निवडणूक आली की काही लोकांना मुंबई महाराष्ट्रापासून तुटणार असल्याची भीती वाटते. पण उद्धव ठाकरेंनी समोर यावे, मीही समोर येतो, होऊन जाऊ द्या आमनेसामने! गेल्या 25 वर्षांत तुम्ही मुंबईकरांसाठी नक्की काय केले, याचा हिशोब द्या," अशा शब्दांत कदम यांनी ठाकरेंना जाहीर आव्हान दिले. मुंबईच्या विकासापेक्षा केवळ भावनिक राजकारण केल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

यावेळी रामदास कदम यांनी युवा पिढीच्या नेतृत्वावर भाष्य करताना आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचा उल्लेख 'पिल्लं' असा केला. मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्या संभाव्य युतीवर निशाणा साधताना ते म्हणाले की, "दोन काय, अजून दोन-पाच भाऊ एकत्र आले तरी मराठी माणूस तुम्हाला मतदान करणार नाही." या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा: Ajit Pawar In Pune : 'पुण्यातील त्रिकुट कारभार बदलायला हवा'; विकासकामांवरून अजित पवार भडकले, ते त्रिकुट कोण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला 'अभिजात भाषेचा' दर्जा देऊन मराठी माणसाला न्याय दिला, असे सांगत कदम यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. "पंतप्रधानांनी एवढा मोठा निर्णय घेतला, मग तुम्ही त्यांचे साधे अभिनंदन का करू शकला नाही?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मराठी अस्मितेचा केवळ वापर करणाऱ्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानण्याचे सौजन्यही दाखवले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

उद्धव ठाकरेंच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना रामदास कदम यांनी 'सौ सोनार की, एक लोहार की' या म्हणीचा वापर केला. "एकनाथ शिंदेंनी एक असा घाव घातला की तुमची सत्ता आणि पक्ष दोन्ही गेले. तुमच्यावर ही वेळ का आली, याचे आता तरी आत्मपरीक्षण करा," असे कदम म्हणाले. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील बंडानंतर ठाकरे गटाची झालेली पीछेहाट ही त्यांच्याच चुकीच्या धोरणांचा परिणाम असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

सभेच्या शेवटी, मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार असा विश्वास रामदास कदम यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईचा कायापालट करण्यासाठी जनता महायुतीलाच कौल देईल, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरला. वरळीतील ही सभा आगामी निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

हेही वाचा: Dharashiv : "माझ्या केबिनमध्ये या आणि…" शिंदेंच्या नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ; धाराशिवमधील भाषणात नेमकं काय झालं?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number