मुंबई: मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना हात घालत आणि 'विकसित मुंबई, सुरक्षित मुंबई' या वचनाशी कटिबद्ध राहत, नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांनी पदाची सूत्रे स्वीकारताच मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. दरवर्षी जुलै महिन्यात होणाऱ्या पाणीपट्टीतील 8 टक्के दरवाढीच्या टांगत्या तलवारीतून मुंबईकरांची सुटका होणार आहे. ही दरवाढ स्थगित करून दर स्थिर ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही महापौर तावडे यांनी दिली आहे. तसेच, वर्षानुवर्षे मुंबईला ग्रासणाऱ्या टँकर माफियांची मक्तेदारी मोडीत काढून 'टँकर माफिया फ्री मुंबई' हे धोरण राबविण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प त्यांनी केला आहे.
बुधवारी मुंबई महापालिकेच्या सभागृहात पार पडलेल्या निवडणुकीत रितू तावडे यांची महापौरपदी तर संजय घाडी यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड करण्यात आली. विरोधी पक्षाकडून कोणताही अर्ज न आल्याने ही निवड प्रक्रिया सुरळीत पार पडली. पीठासीन अधिकारी तथा महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी या निवडीची अधिकृत घोषणा केली. पदभार स्वीकारल्यानंतर सहा पानी भाषणात महापौरांनी मुंबईच्या विकासाचे 'व्हिजन' मांडले. यामध्ये केवळ पाणीपुरवठाच नव्हे, तर रस्ते, आरोग्य आणि फेरीवाला धोरण यावरही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
हेही वाचा: T20 World Cup: 'आम्ही 'मॅच मोड'मध्ये आलोय'; भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्यावर तिलक वर्माने स्पष्टच सांगितलं...
आरोग्य आणि समाजकल्याणाच्या दृष्टीनेही महापौरांनी मोठे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धर्तीवर, महापौर निधीतून मिळणारी मदत आता पाच हजार रुपयांवरून थेट 50 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात लिहिलेली मूल्ये शाळेमधील सर्व वर्गात शिकवली जाणार आहेत.
याशिवाय, मुंबईतील फेरीवाल्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्व पात्र फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून त्यांना त्वरित प्रमाणपत्र आणि ओळखपत्र देण्यात येईल. 'हॉकिंग झोन्स' निश्चित करून तिथेच त्यांचे पुनर्वसन केले जाईल आणि उर्वरित क्षेत्रे 'नॉन हॉकिंग झोन्स' म्हणून घोषित केली जातील.
पाणीपुरवठ्याबाबत बोलताना महापौर म्हणाल्या की, येत्या पाच वर्षांत प्रलंबित पाणीपुरवठा प्रकल्प पूर्ण करून शहराला अतिरिक्त पाणी उपलब्ध करून दिले जाईल. पाण्याचे समान वितरण व्हावे, यासाठी अत्याधुनिक 'फ्लो मीटर' बसविण्यात येतील, तर गळती शोधण्यासाठी प्रत्येक विभागात विशेष यंत्रणा आणि कॅमेरे तैनात केले जातील.
विशेष म्हणजे, पावसाचे पाणी वाया न घालवता ते जमिनीत मुरवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे धोरण आखले जात आहे. जे नागरिक 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' करतील, त्यांना जलदेयके आणि मालमत्ता करामध्ये सवलत देण्याचे औदार्यही पालिकेने दाखवले आहे.
मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांचे विघ्न दूर करण्यासाठी महापौरांनी 'युटिलिटी टनेल'ची (Utility Tunnel) आधुनिक संकल्पना मांडली आहे. यापुढे शहरात नऊ मीटरपेक्षा कमी रुंदीचे रस्ते डांबरी, तर त्यापेक्षा जास्त रुंदीचे रस्ते काँक्रीटचे करण्यात येतील. तसेच, पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी भुयारी आणि जमिनीवरील पार्किंगची निर्मिती करण्यावर भर दिला जाईल.
पादचाऱ्यांसाठी विशिष्ट प्रकारच्या काँक्रीटपासून 'स्नेही पदपथ' बनवण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.प्रशासकीय शिस्त आणि संयमाचे दर्शन घडवत, पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पीठासीन अधिकारी म्हणून ही निवडणूक प्रक्रिया अत्यंत कुशलतेने हाताळली. प्रशासक म्हणून त्यांची कारकीर्द आता अंतिम टप्प्यात असली, तरी पुढील 40 दिवस ते आयुक्त म्हणून लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम पाहणार आहेत. महापौरांनी मांडलेला हा विकासाचा आराखडा आणि प्रशासनाची त्याला मिळणारी साथ, मुंबईचे रूप पालटणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
हेही वाचा: Rajpal Yadav Bail Hearing: "इंडस्ट्री आमच्या पाठीशी ठाम उभी" अभिनेते राजपाल यादव यांच्या पत्नीने मानले सर्वांचे आभार; कोर्टाच्या निकालाकडे लक्ष