मुंबई: महाराष्ट्राच्या राजकीय पटावर सगळ्यांत चर्चेत असलेली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता वेग पकडताना दिसत आहे. या निवडणुकीचं महत्त्व केवळ मुंबईपुरतं नाही, तर राज्याच्या सत्तासमीकरणांवर थेट परिणाम करणारे ठरणार आहे. दरम्यान, मुंबईतील सर्व 227 प्रभागांसाठीची आरक्षण सोडत 11 नोव्हेंबर 2025 रोजी काढण्यात येणार असल्याचं अधिकृतपणे जाहीर झालं आहे. या सोडतीनंतर कोणत्या प्रभागांवर महिला, ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती तसेच सामान्य प्रवर्गासाठी जागा राखीव राहतील, हे स्पष्ट होणार आहे. राजकीय पक्षांनी याआधीच आपली गणितं मांडायला सुरुवात केली आहे.
विशेषतः महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)ने मुंबईतील सर्व प्रभागांचा सखोल अभ्यास पूर्ण केला आहे. पक्षाच्या अंतर्गत बैठकीत घेतलेल्या आढाव्यानुसार, मनसेची ताकद 227 पैकी जवळपास 125 प्रभागांमध्ये प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. दादर, परळ, लालबाग, माहीम, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि जोगेश्वरी यांसारख्या मराठी मतदारबहुल भागांमध्ये पक्षाने चांगली पकड निर्माण केल्याचा विश्वास मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आहे. याच पार्श्वभूमीवर, निवडणुकीपूर्व तयारीसाठी मनसेकडून संभाव्य उमेदवारांची यादी तयार करण्यात आली असून, अनेक उमेदवार आधीपासूनच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज आहेत. दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि मनसे यांच्या युतीच्या चर्चांनाही आता अधिक वेग आला आहे. या दोन पक्षांमध्ये “कोणत्या जागेवर कोणाची ताकद अधिक” याचा सविस्तर अभ्यास सुरू आहे. युती झाल्यास जागावाटपाचं सूत्र सध्या स्पष्ट झालेलं नाही, परंतु आरक्षण सोडतीनंतरच जागावाटपाची प्रत्यक्ष चर्चा सुरू होणार असल्याचं दोन्ही पक्षांच्या सूत्रांकडून समजत आहे.
हेही वाचा: Maharashtra Winter Season: महाराष्ट्रात थंडीची लाट; पुणे - मुंबईसह राज्यभरात गारठा वाढला
सूत्रांच्या माहितीनुसार, मेरिटनुसार आणि स्थानिक संघटनशक्ती पाहून प्रत्येक पक्षाला जागा वाटप केल्या जाण्याची शक्यता आहे. या घडामोडींमुळे मुंबईचं राजकारण पुन्हा एकदा रंगात आलं आहे. भाजप आणि शिंदे गटही या हालचालींकडे बारीक लक्ष ठेवून आहेत. ठाकरे-मनसे युती झाली, तर मुंबईतील मराठी मतदारसंघांमध्ये समीकरणं पूर्णपणे बदलू शकतात, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी वर्तवला आहे. आगामी निवडणुकीत महापालिका निवडणूक ही केवळ स्थानिक नव्हे तर राज्यातील प्रतिष्ठेचा लढा ठरणार आहे, यात शंका नाही.
मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रमही जाहीर झाला आहे. 30 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान आरक्षित जागांची संख्या निश्चित करून त्यावर आयोगाची मान्यता घेण्यात येणार आहे. त्यानंतर 6 नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडतीची जाहिर सूचना वृत्तपत्रांत प्रसिद्ध होईल, तर 11 नोव्हेंबर रोजी सोडत काढून निकाल जाहीर केला जाईल. या निकालावर पुढील राजकीय समीकरणांची दिशा ठरणार आहे. त्यानंतर 14 नोव्हेंबरपासून प्रारूप आरक्षणाबाबत हरकती आणि सूचना मागवण्यात येतील, ज्यांची अंतिम मुदत 20 नोव्हेंबरपर्यंत असेल. आयुक्तांकडून या हरकतींवर 21 ते 27 नोव्हेंबर दरम्यान विचार करून निर्णय घेतला जाईल आणि अखेरीस 28 नोव्हेंबरला अंतिम आरक्षण जाहीर केलं जाणार आहे.
या संपूर्ण प्रक्रियेकडे मुंबईतील सर्व पक्ष आणि संभाव्य उमेदवार आतुरतेने पाहत आहेत. कारण या सोडतीनंतरच आगामी रणनिती आखली जाईल. ठाकरे गट आणि मनसे युती झाली तर मराठी मतदारांच्या एकजुटीचा नवा राजकीय अध्याय लिहिला जाईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. तर भाजप आणि शिंदे गट आगामी निवडणुकीत पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी सज्ज आहेत. एकूणच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे, आणि 11 नोव्हेंबरची तारीख ठरवणार आहे. मुंबईच्या राजकारणात पुढचं पान कोण लिहिणार!
हेही वाचा: Tirupati Laddu Ghee Scam: तिरुपती मंदिराला लाडूसाठी 250 कोटींचं बनावट तूप पुरवलं; CBIचा धक्कादायक अहवाल