Mumbai Expressway: नववर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. महामुंबई परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा बडोदा-मुंबई द्रुतगती महामार्ग लवकरच सुरू होण्याच्या मार्गावर आहे. दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाशी जोडलेला हा नवा मार्ग मुंबईच्या प्रवेशासाठी एक पर्यायी आणि वेगवान पर्याय ठरणार आहे.
सध्या उत्तर भारतातून येणारी मोठ्या प्रमाणातील वाहतूक अहमदाबाद महामार्ग, त्यानंतर घोडबंदर रोड, ठाणे-बेलापूर किंवा ठाणे-मुंब्रा-तळोजा मार्गाने मुंबई आणि जेएनपीए बंदराकडे वळते. यामुळे ठाणे, घोडबंदर रोड, बेलापूर, नवी मुंबई परिसरात सतत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. विशेषतः जेएनपीए बंदराकडे जाणाऱ्या हजारो मालवाहू ट्रकांमुळे ही समस्या अधिक तीव्र होते.
ही कोंडी कमी करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) बडोदा-मुंबई द्रुतगती महामार्गाचे काम सुरू आहे. हा पूर्णपणे नवा आठ पदरी महामार्ग असून महाराष्ट्रातील तलासरीपासून बदलापूरजवळील मोरबेपर्यंत सुमारे 156 किलोमीटर लांबीचा असेल. सध्या या महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून 2026 मध्ये तो सर्वसामान्यांसाठी खुला होण्याची शक्यता आहे.
या महामार्गाचा पहिला टप्पा तलासरी ते शिरसाड दरम्यानचा असून सुमारे 80 किलोमीटर लांबीचा आहे. यातील काही भागाचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम येत्या फेब्रुवारी-मार्चपर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे. दुसरा टप्पा शिरसाड ते मोरबे दरम्यानचा असून हा भाग एप्रिलअखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या द्रुतगती मार्गामुळे केवळ मुंबई प्रवेशच जलद होणार नाही, तर ठाणे, घोडबंदर रोड, नवी मुंबई आणि आसपासच्या भागातील वाहतूक ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल. विशेषतः मालवाहतुकीसाठी हा मार्ग अत्यंत उपयुक्त ठरणार असून जेएनपीए बंदरापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.
या महामार्गाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला समृद्धी महामार्गाची मिळणारी जोडणी. भिवंडी परिसरात हा द्रुतगती मार्ग मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना थेट मुंबईकडे वेगवान आणि सुलभ मार्ग उपलब्ध होणार आहे. बडोदा-मुंबई द्रुतगती महामार्गामुळे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडणार असून मुंबईकरांसाठी हा मार्ग ‘गेम चेंजर’ ठरण्याची चिन्हे आहेत.