मुंबईची लोकल ट्रेन ही शहराची खरी ‘लाईफलाईन’ मानली जाते. दररोज लाखो प्रवासी याच लोकलवर विसंबून ऑफिस, कामधंदा किंवा इतर ठिकाणी पोहोचतात. अशा वेळी एखादी लोकल फक्त काही मिनिटे उशिरा आली तरी प्लॅटफॉर्मवर मोठी गर्दी उसळते. पण आता मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मध्य रेल्वेने तब्बल 18 तासांचा सलग मेगा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. याचा थेट परिणाम लोकलपासून मेल एक्स्प्रेसपर्यंत सर्व गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार आहे.
एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्टेशन परिसरातील ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन ब्रिज पाडण्यासाठी हा मोठा ब्लॉक घेतला जात आहे. वरळी ते शिवडी उन्नत मार्गाच्या कामासाठी 125 वर्षे जुन्या पुलाचा बहुतांश बाहेरील भाग आधीच जमीनदोस्त करण्यात आला असला तरी रेल्वे मार्गावर असलेला लोखंडी सांगाडा हटवण्याचे काम दीर्घकाळ थांबलं होतं. हेच काम पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने फक्त एक नव्हे तर एकूण आठ ब्लॉक घेण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यातील सर्वात मोठा 18 तासांचा ब्लॉक तर उर्वरित सात ब्लॉक प्रत्येकी दोन-दोन तासांच्या कालावधीचे असतील.
हेही वाचा: Smriti Mandhana: लग्नाची अनिश्चितता… पण स्मृती मानधनाच्या मैदानात परतण्याची तारीख ठरली
रेल्वेच्या या निर्णयामुळे ठाणे-सीएसएमटी, कल्याण-पनवेल अशा मुख्य मार्गांवरील लोकल सेवेला मोठा फटका बसू शकतो. गाड्यांची वारंवारता कमी होण्याबरोबरच काही गाड्यांचे मार्ग बदलले जाण्याची किंवा त्या रद्द करण्याचीही शक्यता आहे. दिवसभरातून रात्रीपर्यंत हा मोठा ब्लॉक चालणार असल्याने प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासात मोठी गैरसोय होऊ शकते. लांब पल्ल्यांच्या गाड्यांवरही याचा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.
काही एक्स्प्रेस किंवा मेल गाड्या पर्यायी प्लॅटफॉर्मवर वळवाव्या लागू शकतात. त्यामुळे प्रवाशांनी या कालावधीत प्रवास करण्यापूर्वी रेल्वेचे अपडेटेड वेळापत्रक तपासणे अत्यावश्यक ठरणार आहे. रेल्वे प्रशासनाने मात्र हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले आहे, जेणेकरून पुढील काळात मोठा अडथळा किंवा सुरक्षा धोका निर्माण होऊ नये. एल्फिन्स्टन पुलाचा रेल्वेमार्गावरील धोकादायक सांगाडा दूर झाला की कामाचा सर्वात गुंतागुंतीचा टप्पा पार पडेल.