Smriti Mandhana: टीम इंडियाची स्टार ओपनर स्मृती मानधना गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत होती. तिचं लग्न काही दिवसांवर आलं होतं; तयारी जोरात सुरू होती. मात्र लग्नाच्या अगोदरच तिच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांना हार्ट अटॅक आला. या अनपेक्षित घटनेमुळे स्मृतीने सर्व निर्णय मागे घेऊन लग्न तात्पुरते पुढे ढकलले. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये तिच्या लग्नाबद्दल पुन्हा उत्सुकता निर्माण झाली आहे. नवी तारीख कधी जाहीर होणार? हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे.
पण लग्नाची तारीख थांबली असली तरी स्मृतीने क्रिकेटपासून अंतर वाढू दिलेले नाही. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर तिच्या कामगिरीने पुन्हा एकदा तिचे नाव देशभरात गाजले. स्पर्धेत सर्वाधिक धावा करून तिने टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयानंतर प्रकाशझोतात आली. तिचं मैदानातलं वर्चस्व मनात ठेवूनच भारतीय संघ व्यवस्थापन तिच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहे.
दरम्यान, वर्ल्ड कपनंतर भारताचा महिला क्रिकेट संघ नव्या मालिकेसाठी सज्ज होत आहे. श्रीलंका महिला संघ भारताच्या दौऱ्यावर येणार असून या मालिकेत पाच टी-20 सामन्यांचा समावेश आहे. क्रिकेट मंडळाकडून मिळालेल्या संकेतांनुसार या मालिकेसाठी स्मृती उपलब्ध राहण्याची शक्यता प्रबळ आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी ठरली आहे.
या मालिकेतील पहिला सामना 21 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. मालिकेतील प्रारंभीचे दोन सामने विशाखापट्टणम येथे होतील, तर उर्वरित तीन तिरुवनंतरपुरममध्ये रंगणार आहेत. याच मालिकेतून स्मृती पुन्हा एकदा भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसू शकते, अशी चर्चा क्रीडा वर्तुळात सुरू आहे. लग्नाच्या तणावातून बाहेर पडण्यासाठी आणि स्वतःला पुन्हा सावरायला क्रिकेट तिच्यासाठी मोठा आधार ठरणार, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
स्मृतीचं लग्न मालिकेपूर्वी होईल अशी शक्यता सध्या तरी कमी वाटते. तिच्या कुटुंबाकडून नवीन तारखेची अधिकृत घोषणा होईपर्यंत चाहत्यांना प्रतीक्षा करावी लागेल. मात्र एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. स्मृतीला मैदानापासून दूर ठेवणं कठीण आहे. कोणत्याही परिस्थितीत ती पुन्हा बॅट हातात घेण्यास तयार आहे आणि आपल्या संघाला पुढील मालिकेत मजबूत सुरुवात देण्यासाठी सज्ज आहे.
स्मृती मानधनाचं वैयक्तिक आयुष्य जिथे एका अनपेक्षित वळणावर थांबलं आहे, तिथे तिचं व्यावसायिक आयुष्य पुन्हा वेग पकडत आहे. तिचं मैदानातलं पुनरागमन पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. क्रिकेट विश्वात तिच्या पुनरागमनाचा धडाका पाहण्यासाठी २१ डिसेंबरची तारीख आता सर्वांच्या कॅलेंडरमध्ये हायलाइट झाली आहे.