मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवार, दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान, तर हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकांदरम्यान हा ब्लॉक घेण्यात येईल.या मेगाब्लॉकमुळे प्रभावित होणाऱ्या लोकल सेवांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
मुख्य मार्ग
ब्लॉकचा कालावधी: माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत ब्लॉक असेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.32 या वेळेत सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील लोकल माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबतील. त्यानंतर मुलुंड येथे त्या पुन्हा डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल गंतव्यस्थानी नियोजित वेळेपेक्षा सुमारे 15 मिनिटे उशिरा पोहोचतील.
ठाणे येथून सकाळी 11.07 ते दुपारी 3.51 या वेळेत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. मुलुंड ते माटुंगा या दरम्यान त्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव या स्थानकांवर थांबतील. त्यानंतर माटुंगा येथे पुन्हा अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकलही गंतव्यस्थानी सुमारे 15 मिनिटे उशिरा पोहोचतील.
CSMT येथून सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत सुटणाऱ्या किंवा CSMT येथे येणाऱ्या अप आणि डाउन मार्गावरील सर्व उपनगरीय लोकल त्यांच्या गंतव्यस्थानी नियोजित वेळेपेक्षा सुमारे 15 मिनिटे उशिरा पोहोचतील.
हार्बर मार्ग
ब्लॉकचा कालावधी: CSMT ते चुनाभट्टी आणि वांद्रे दरम्यान डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 वाजेपर्यंत, तर चुनाभट्टी आणि वांद्रे ते CSMT दरम्यान अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत ब्लॉक असेल.
CSMT येथून सकाळी 11.16 ते सायंकाळी 4.47 या वेळेत वाशी, बेलापूर आणि पनवेलकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील लोकल रद्द राहतील. तसेच, CSMT येथून सकाळी 10.48 ते सायंकाळी 4.43 या वेळेत वांद्रे आणि गोरेगावकडे जाणाऱ्या लोकलही रद्द राहतील.
पनवेल, बेलापूर आणि वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 या वेळेत CSMTकडे येणाऱ्या, तसेच गोरेगाव आणि वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 या वेळेत CSMTकडे येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल सेवा बंद राहतील.
प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था
मेगाब्लॉकच्या कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक 8) दरम्यान दर 20 मिनिटांनी विशेष लोकल चालवण्यात येतील.
ठाणे ते वाशी/नेरुळ आणि पुन्हा ठाणे या ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल सेवा निर्धारित वेळापत्रकानुसार सुरू राहतील. तसेच, नेरुळ/बेलापूर ते उरण आणि पुन्हा नेरुळ/बेलापूर या पोर्ट मार्गावरील सेवाही वेळापत्रकानुसार चालवल्या जातील.
हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 या वेळेत मुख्य मार्गावरून आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची मुभा असेल.
रेल्वे मार्गांची देखभाल आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हे ब्लॉक आवश्यक असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या कालावधीत प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता असून, त्याबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.