राज्यातील 29 महापालिकांचे निकाल लागले असून आता महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत काल पार पडली आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. 29 महापालिका सोडतीसाठी भाजपकडून महामंत्री राजेश शिरवडकर, ठाकरे गटाकडून मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार मनोज जामसुतकर, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार गटाकडून आनंद परांजपे उपस्थित होते. आरक्षण जाहीर होण्यापूर्वीच महापौर पदासाठी मोठी रस्सीखेच बघायला मिळाली. यात अनुसूचित जमातीसाठी एक, अनुसूचित जातीसाठी 3, ओबीसीसाठी 8 तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 17 महापालिकांची सोडत जाहीर झाली आहे. यामध्ये आशिया खंडातील श्रीमंत महापालिका असलेली मुंबईची चावी महिलांच्या हाती गेली असून मुंबईतील महापौर पदासाठी कोणाकोणाची नावं चर्चेत आली आहेत ते जाणून घ्या.
हेही वाचा- Mayor Reservation 2026 : श्रीमंत महापालिकेची चावी महिलेच्या हाती! जाणून घ्या कोणकोणत्या महानगरपालिकेवर महिलाराज
मुंबईत महापौर पदाचे दावेदार
तेजस्वी घोसाळकर यांच नाव यावेळेस मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं असून तेजस्वी घोसाळकर या निवडणुकीआधीपर्यंत ठाकरे गटात होत्या. मात्र ठाकरे गटात कुचंबणा होतेय सांगत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दिवंदत पती अभिषेक यांच्या जागी मुंबई बँकेत संचालक मंडळावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपमध्ये आयारामांचेच लाड होतात अशी टीका विरोधक करणार.
त्यानंतर हर्षिता नार्वेकर यांच नाव देखील चर्चेत आलं आहे. हर्षिता नार्वेकर या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या वहिनी आहेत. यांना महापौर केलं तर नार्वेकर कुटुंबात दोन मोठी पदं जातील. यामुळे विरोधकांना भाजपवर घराणेशाहीचा आरोप करण्याची संधी मिळेल.
हेही वाचा- BMC Mayor History : मुंबई महापालिकेत आजवर 'या' रणरागिणींनी भूषवलं महापौरपदं; एक वगळता उर्वरीत सगळ्या एकाच पक्षाच्या प्रतिनिधी, वाचा संपूर्ण यादी
त्यानंतर राजश्री शिरवडकर यांच नाव देखील पुढे आल्याचं पाहायला मिळत आहे. अतिशय सामान्य कुटुंबात यांचा जन्म झाला. सामान्य कार्यकर्ती ते नगरसेवक असा त्यांचा प्रवास आहे. यांना महापौर केलं तर कार्यकर्ते खुश होतील. भाजपमध्ये निष्ठावानांना पदं दिली जातात असं पक्षाला सांगता येईल. आम्ही सामान्य मराठी महिलेला महापौर केलं असं भाजपला सांगता येईल.