मुंबई: 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी मतदान झाले आणि 16 जानेवारीला जाहीर झालेल्या निकालांमध्ये राज्यातील बहुतांश महानगरपालिकांवर भाजपचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून आले. विशेषतः देशातील सर्वात श्रीमंत आणि आशियातील सर्वात मोठी महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकाच्या महापौरपदावर कोण विराजमान होणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. या चर्चांना आता पूर्णविराम मिळाल्याचे चित्र आहे.
भाजपच्या एका वरिष्ठ आणि खात्रीशीर नेत्याने ‘जय महाराष्ट्र’ला दिलेल्या माहितीनुसार, 30 जानेवारी रोजी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपचाच उमेदवार विराजमान होणार आहे. शिवसेनेकडून (शिंदे गट) येणाऱ्या कोणत्याही दबावतंत्राला भाजप बळी पडणार नाही, आणि महापौरपदावर भाजपचाच दावा अंतिम असल्याचे या नेत्याने स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर भाजपने आपली भूमिका अधिकृतपणे स्पष्ट केली असून, शिवसेनेच्या कोणत्याही राजकीय दबावाला न जुमानता भाजपचा महापौरच निवडला जाईल, असा ठाम संदेश दिला आहे. त्यामुळे मुंबई महापौरपदावर भाजपचा झेंडा फडकणार, हे जवळपास निश्चित झाले असल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे, शिवसेना (शिंदे गट) कडून महापौरपदासाठी अडीच - अडीच वर्षांचा फॉर्म्युला मांडण्यात आला होता. मात्र, भाजपच्या या ठाम भूमिकेनंतर त्या चर्चांनाही आता पूर्णविराम मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा: Vijay Wadettiwar : 'भाजपचे नगरसेवक आमच्या संपर्कात'; कॉँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य
मुंबई महापौरपदावर भाजपचा दावा निश्चित झाल्याने राज्यातील राजकारणात हा विषय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला होता. अनेक दिग्गज नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या, तर काहींनी संभाव्य नावांवर मतप्रदर्शन केले. मात्र, आता भाजपने आपली भूमिका स्पष्ट केल्याने या सर्व चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
आता केवळ एकच प्रश्न शिल्लक राहिला आहे भाजपचा महापौर नक्की कोण असणार? तो महापौर मराठी असणार की अन्य कोण, याबाबतचे चित्र येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार असून, मुंबईच्या राजकारणात पुढील महत्त्वाचा अध्याय लवकरच सुरू होणार आहे.
हेही वाचा: KDMC Election 2026 : ठाकरे सेनेचा 'नॉट रिचेबल' नगरसेवकांना अल्टिमेटम; पक्षद्रोहाचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई करणार