Drone & Flying Lantern Ban In Mumbai: आगामी दिवाळी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आयुक्तालयाने सार्वजनिक सुरक्षा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरात ड्रोन आणि आकाश कंदील (Flying Lanterns) उडवण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. अपघात, आगीचा धोका आणि समाजकंटकांकडून होणारा संभाव्य गैरवापर टाळण्यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे.
हेही वाचा - Navi Mumbai Airport: पंतप्रधानांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन; पहिलं उड्डाण कोणती एअरलाईन करणार?
दोन टप्प्यात बंदीची अंमलबजावणी
मुंबई पोलिसांनी ही बंदी दोन वेगवेगळ्या टप्प्यांत लागू केली आहे. यातील पहिल्या टप्प्यात 7 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2025 पर्यंत ड्रोन, रिमोट-कंट्रोल्ड मायक्रो-लाइट विमाने, पॅराग्लायडर, पॅरामोटर्स, हँड ग्लायडर आणि हॉट एअर बलून उडवण्यावर पूर्ण बंदी असेल. तथापी, स्वतंत्रपणे, उडत्या कंदीलांचा वापर, साठवणूक आणि विक्री 12 ऑक्टोबर पासून सुरू होऊन 10 नोव्हेंबर 2025 पर्यंत 30 दिवसांच्या कालावधीसाठी सक्त मनाई असेल.
हेही वाचा - Gold-Silver Price Today: आजच्या बाजारात सोन्याचे दर घसरले, चांदीच्या भावात अचानक वाढ; जाणून घ्या
कायद्याचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई
दरम्यान, पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. या आदेशाला एकमेव अपवाद म्हणजे मुंबई पोलिसांनी केलेले हवाई निरीक्षण किंवा पोलिस उपायुक्त (ऑपरेशन्स) यांनी स्पष्ट लेखी परवानगी दिलेली कोणतीही कृती. पोलिसांनी मुंबईकरांना धोकादायक पद्धती टाळून सुरक्षित आणि शांततापूर्ण पद्धतीने उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.