Mumbai-Pune Bullet Train: रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबई आणि पुण्यातील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. मुंबई-पुणे दरम्यान वेगवान प्रवास शक्य व्हावा आणि कनेक्टिव्हिटी सुधारावी यासाठी बुलेट ट्रेन कॉरिडोअर विकसित केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 'आता मुंबईत वडापाव अन् पुण्यात बाकरवडी खाण्यासाठी लोक दिवसातून दोनदा सहज ये-जा करू शकतील,' असा अनोखा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याशिवाय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात थांबलेले बुलेट ट्रेनचे काम आता वेगाने सुरू असून, मुंबई ते हैदराबाददरम्यान अवघ्या 3.25 तासांत प्रवास पूर्ण करता येईल अशा सुविधांवर काम सुरू असल्याचेही वैष्णव यांनी सांगितले.
मुंबईकरांना 238 नव्या एसी लोकलची भेट; 2027 पासून सेवेत
मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व सुरक्षित करण्यासाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईसाठी तब्बल 238 नवीन एसी लोकल गाड्यांना मंजुरी देण्यात आली आहे. स्वयंचलित दरवाजे असलेल्या यापैकी पहिली एसी लोकल 2027 मध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असून, 2030 पर्यंत टप्प्याटप्प्याने सर्व गाड्या मुंबईत धावू लागतील. सध्या मुंबईमध्ये सिग्नल यंत्रणा अद्ययावत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी 15 डब्यांच्या लोकल फेऱ्यांची संख्या वाढवण्यावर भर दिला जात आहे.
350 हून अधिक गणेशोत्सव स्पेशल गाड्या अन् 18 हजार कोटींची कामे
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे. निवडणुकीच्या काळात दिलेले आश्वासन पूर्ण करत यंदाच्या सणात 350 हून अधिक स्पेशल गाड्या चालवल्या जात असून आवश्यकता भासल्यास आणखी 20 अतिरिक्त गाड्या सोडल्या जातील, असे रेल्वेमंत्र्यांनी नमूद केले. मुंबई आणि लगतच्या परिसरात सध्या 18000 कोटी रुपयांची रेल्वेची पायाभूत कामे सुरू असल्याचेही त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून निर्णयाचे स्वागत
मुंबई-पुणे बुलेट ट्रेन आणि नव्या एसी लोकलच्या घोषणेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. "अशक्य वाटणारी कामेही रेल्वे मंत्रालय यशस्वीपणे पूर्ण करत आहे. ही रेल्वे सेवा कोकणवासियांच्या जन्मभूमीला आणि कर्मभूमीला जोडणारा मुख्य दुवा ठरेल," असे सांगत त्यांनी या महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे मनापासून स्वागत केले आहे.