Tuesday, November 18, 2025 03:01:53 AM

Murlidhar Mohol vrs Raju Shetti: मुरलीधर मोहोळ यांच्या वादग्रस्त व्यवहारावर राजू शेट्टींचा आरोप; ५० कोटींचा व्यवहार रद्द करण्याची मागणी

पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या जागेच्या कथित बेकायदेशीर विक्रीवरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ अडचणीत सापडले आहेत.

murlidhar mohol vrs raju shetti मुरलीधर मोहोळ यांच्या वादग्रस्त व्यवहारावर राजू शेट्टींचा आरोप ५० कोटींचा व्यवहार रद्द करण्याची मागणी

पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या जागेच्या कथित बेकायदेशीर विक्रीवरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या व्यवहारात मोहोळ यांच्या भूमिकेबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी आरोप केला की, गोखले बिल्डर्सला ५० कोटींचं कर्ज अतिशय कमी कालावधीत मंजूर झालं, आणि या संपूर्ण प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाला असावा. त्यामुळे मोहोळ यांनी हा व्यवहार तात्काळ रद्द करावा, अशी त्यांची ठाम मागणी आहे.
 
या संदर्भात राजू शेट्टी यांनी माहिती दिली की, “मुरलीधर मोहोळ यांनी जरी सांगितले की त्यांचा गोखले कंपनीशी संबंध नाही आणि ते २०२४ मध्येच बाहेर पडले, तरी आमच्याकडे पुरावे आहेत की त्यांनी जैन बोर्डिंगच्या परिसराला भेट दिली होती. ट्रस्टींसोबत त्यांची बैठकही झाली होती. हे सर्व कोणत्या हेतूने घडले, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. जर त्यांच्या मनात काही चुकीचा हेतू नसेल, तर आम्हाला काही म्हणायचे नाही.”
 
शेट्टींनी पुढे म्हटले की, “गोखले बिल्डर्सने अर्ज केल्यानंतर तात्काळ ५० कोटींचं कर्ज मंजूर कसं झालं? कर्नाटकातील सीकोडी येथील अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीकडून एवढ्या मोठ्या रकमेला मंजुरी मिळणे ही साधी बाब नाही. या सोसायटीचे चेअरमन भाजपचे माजी खासदार आहेत, आणि धर्मादाय आयुक्त कलोते हे मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक आहेत. एवढे ‘योगायोग’ एका व्यवहारात कसे घडू शकतात?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा : Maharashtra Local Body Elections: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डिसेंबरमध्ये; नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार घोषणा
 

मुरलीधर मोहोळ यांनी स्वतःचा बचाव करताना म्हटले आहे की, “माझा गोखले कंपनीशी कुठलाही संबंध नाही. मी या कंपनीतून २०२४ मध्येच बाहेर पडलो आहे. राजू शेट्टींना चुकीची माहिती दिली गेली आहे. ते केवळ राजकीय वातावरण तापवत आहेत.” मोहोळ पुढे विरोधकांवर पलटवार करत म्हणाले की, “रविंद्र धंगेकर हे तर बिळातील उंदीर आहेत.”
 
राजू शेट्टी यांनी मात्र सांगितले की, “आमच्याकडे मोहोळ यांनी बोर्डिंगच्या ठिकाणी दिलेल्या भेटीचे फोटो आहेत. २३० कोटींच्या जागेवरून ३ हजार कोटींचा नफा मिळवणारा प्रकल्प कसा काय परवानगी मिळवतो? जर एका फ्लॅटची किंमत ६ कोटी असेल, तर एकूण प्रकल्पाचा आकार किती मोठा आहे हे स्पष्ट होतं. या सगळ्या व्यवहाराची सखोल चौकशी व्हायला हवी.”
 
या प्रकरणामुळे पुण्यातील रिअल इस्टेट वर्तुळासोबतच राजकीय क्षेत्रातही खळबळ माजली आहे. एकीकडे मुरलीधर मोहोळ यांच्याकडून सफाई दिली जात असताना, दुसरीकडे राजू शेट्टी यांच्याकडून आरोपांची मालिका सुरूच आहे. आता या वादग्रस्त ५० कोटींच्या व्यवहाराबाबत राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : PM Kisan Yojana Installment : खुशखबर! पीएम किसान योजनेचा हप्ता लवकरच खात्यात होणार जमा, समोर आली मोठी अपडेट


सम्बन्धित सामग्री