पुणे: जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणावरून पुण्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणी, शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोपांची मालिका सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर, भारताचे नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आणि भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
अलिकडेच, रवींद्र धंगेकरांनी असा दावा केला की, 'जेव्हा मुरलीधर मोहोळ पुण्याचे महापौर होते, तेव्हा ते महापालिकेची शासकीय पाटी लावून पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा (MH 12 SW 0909) ही कार वापरत होते. ही कार ना त्यांची होती, ना शासकीय वाहन होतं, तर ती गाडी कोथरूडमधील बांधकाम व्यावसायिक बढेकर यांची आहे'. यादरम्यान, 'महापौर असताना एका खाजगी व्यावसायिकाचं वाहन वापरणं नीतिमत्तेला धरून आहे का?', असा सवालही रवींद्र धंगेकरांनी उपस्थित केला.
याचबरोबर, रवींद्र धंगेकरांनी आणखी एक गंभीर आरोप करत म्हणाले की, 'हेच तेच बढेकर आहेत ज्यांनी जैन होस्टेल खरेदीसाठी दोन नंबरचा लिलाव लावला आणि या सर्व व्यवहारात मोहोळ यांचा सहभाग असल्याचा संशय आहे'. या आरोपांना प्रत्युत्तर देताना भारताचे नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 'या प्रकरणावर मी आधीच स्पष्टीकरण दिलं आहे. आता माझ्यावर वैयक्तिक टीका केली जात आहे.
हेही वाचा: Islampur Name Change: इस्लामपूरचं नाव आता 'ईश्वरपूर' होणार, नामंतर प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्यानंतर राजकीय नैराश्यातून हे आरोप केले जात आहेत. ज्यांना राजकारणात कोणी विचारत नाही अशा लोकांच्या आरोपांना उत्तर देण्याची गरज नाही', अशी प्रतिक्रिया मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. यादरम्यान, रविंद्र धंगेकरांनी जोरदार प्रत्युत्तर देत म्हणाले की, 'मी कोणत्याही वैयक्तिक आरोपात जात नाही, पण जर मी वैयक्तिक स्तरावर उतरलो, तर त्यांना पुणे सोडून जावं लागेल'.