मित्रांसोबत पार्टी, रात्री स्विमिंग पूलमध्ये उतरले अन्… गेट-टुगेदरला गेलेल्या पोलिसाचा दुर्दैवी अंत

नागपुरात मित्रांसोबत गेटटुगेदरला गेलेल्या लोहमार्ग पोलिसाचा स्विमिंग पूलमध्ये अपघाती मृत्यू झाला. कुही पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मित्रांसोबत पार्टी, रात्री स्विमिंग पूलमध्ये उतरले अन्… गेट-टुगेदरला गेलेल्या पोलिसाचा दुर्दैवी अंत

नागपूर : मित्रांसोबत गेट-टुगेदर पार्टीसाठी गेलेल्या लोहमार्ग पोलिसाचा स्विमिंग पूलमध्ये अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नागपूरमध्ये घडली. सचिन घनश्याम आवारी असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते लोहमार्ग पोलिस मुख्यालयातील सायबर सेलमध्ये शिपाई म्हणून कार्यरत होते. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांसह लोहमार्ग पोलिस दलावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 2013 मध्ये लोहमार्ग पोलिस दलात भरती झालेल्या नऊ मित्रांचा दरवर्षी गेट-टुगेदरचा उपक्रम असतो. यंदाही गणेश विसर्जनानंतर सर्व मित्रांनी एकत्र येण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार नागपूरमधील सोनेगाव परिसरातील बाल गिरी फार्म हाऊसवर सर्व मित्र मुक्कामासाठी गेले होते.

फार्म हाऊसवर रात्री सर्वांनी एकत्र जेवण केले. त्यानंतर रात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास सर्व मित्र स्विमिंग पूलमध्ये उतरले. याचदरम्यान सचिन आवारी हे पूलमध्ये उडी मारत असताना त्यांच्या डोक्याला स्लॅबचा जोरदार फटका बसला. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

घटनेनंतर मित्रांनी तातडीने सचिन यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाला. मित्रांसोबत आनंदाचे क्षण घालवण्यासाठी गेलेल्या सचिन यांच्या अचानक मृत्यूमुळे गेट-टुगेदरच्या आनंदावर दुःखाची छाया पसरली.

सचिन आवारी हे लोहमार्ग पोलिस मुख्यालयातील सायबर सेलमध्ये शिपाई म्हणून कार्यरत होते. 2013 मध्ये भरती झालेल्या मित्रांचा हा गेट-टुगेदरचा उपक्रम अनेक वर्षांपासून सुरू असल्याची माहिती आहे. यंदाच्या भेटीत घडलेल्या या दुर्दैवी घटनेने सर्व मित्रांना मोठा धक्का बसला आहे.

या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला. सचिन यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, लोहमार्ग पोलिस दलातील सहकाऱ्यांकडूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणी कुही पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. स्विमिंग पूलमध्ये नेमका अपघात कसा घडला, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number