नालासोपाऱ्यात नवरात्रोत्सवादरम्यान तुफान राडा! दगडफेक आणि काठ्यांनी हल्ला, 10 जण जखमी

नालासोपारा पूर्वेतील अचोळे मित्र मंडळाच्या नवरात्रोत्सवादरम्यान दोन गटांत जोरदार हाणामारी झाली.

नालासोपाऱ्यात नवरात्रोत्सवादरम्यान तुफान राडा! दगडफेक आणि काठ्यांनी हल्ला, 10 जण जखमी

नालासोपारा : नालासोपारा पूर्वेतील अचोळे परिसरात नवरात्रोत्सवादरम्यान दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. रविवारी रात्री घडलेल्या या प्रकारात दगडफेक करण्यात आली, तसेच काठ्या आणि बांबूच्या काठ्यांनी एकमेकांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेत सुमारे १० जण जखमी झाले असून, परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दुचाकीस्वार आणि टेम्पोचालकातील वादातून हाणामारी

मिळालेल्या माहितीनुसार, अचोळे मित्र मंडळाचा नवरात्रोत्सव सुरू असताना अरुंद रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वार आणि टेम्पोचालक यांच्यात वाद झाला. त्यानंतर मंडळाच्या सदस्यांनी संबंधित दुचाकीस्वाराला मारहाण करून तेथून हाकलून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही वेळानंतर हा दुचाकीस्वार आपल्या समर्थकांसह पुन्हा घटनास्थळी आल्याचे सांगितले जाते. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये वाद वाढला आणि परिस्थिती हिंसक बनली. या वेळी दगडफेक करण्यासह काठ्या आणि बांबूच्या काठ्यांनी हल्ला झाल्याचा आरोप आहे.

मंडळाच्या सदस्यांचा गंभीर आरोप

या घटनेत जखमी झालेल्या मंडळाचे सदस्य विशाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा नावाच्या दुचाकीस्वारासोबत झालेल्या वादानंतर त्याला तेथून पाठवण्यात आले होते. मात्र, तो काही वेळाने १० ते १५ जणांना सोबत घेऊन परतला. त्यांच्या हातात काठ्या आणि बांबूच्या काठ्या होत्या. त्यांनी मंडळाच्या सदस्यांवर दगडफेक केली, तसेच मंडळाच्या मूर्तीचे नुकसान केल्याचाही आरोप विशाल सिंह यांनी केला आहे.

महिलेनेही केली मारहाणीची तक्रार

या हाणामारीत जखमी झालेल्या एका महिलेने घटनास्थळी सुमारे ५० ते ६० जण आल्याचा दावा केला. आपण तेथे उभे असताना आपल्यालाही मारहाण करण्यात आल्याचे तिने सांगितले. दरम्यान, कृष्णाचा मित्र असल्याचा दावा करणाऱ्या शिव यादव याने या घटनेबाबत वेगळी बाजू मांडली आहे. त्यामुळे नेमका वाद कसा सुरू झाला आणि हाणामारीला कोण कारणीभूत होते, हे पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

तुळिंज पोलिसांकडून गुन्हा दाखल

या घटनेतील जखमींना वसई-विरार महापालिकेच्या तुळिंज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रविवारी रात्री उशिरा तुळिंज पोलिसांनी हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नवरात्रोत्सवादरम्यान घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number