नाशिकमध्ये सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी आणि कारवाईची मोहीम सुरू आहे. या मोहिमेदरम्यान सैय्यद पिंपी परिसरातील एका कारखान्यावर कारवाई करत तब्बल 48 लाख 81 हजार 920 रुपये किमतीचा अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सैय्यद पिंपी, नाशिक येथील छाया अॅग्रो प्रा. लि. या आस्थापनाची तपासणी केली. या तपासणीदरम्यान फ्राईड ओनियन आणि रिफाईंड सनफ्लॉवर ऑईलचा मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला.
कारवाईदरम्यान प्रशासनाने तब्बल 1,200 किलो फ्राईड ओनियन जप्त केले. या साठ्याची किंमत सुमारे 48 लाख 3 हजार 200 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. यासोबतच 328 किलो रिफाईंड सनफ्लॉवर ऑईल देखील जप्त करण्यात आले. या तेलाची किंमत 78 हजार 720 रुपये आहे.
अशा प्रकारे दोन्ही अन्नपदार्थांची एकूण किंमत 48 लाख 81 हजार 920 रुपये इतकी आहे. संबंधित अन्नपदार्थांची साठवणूक अस्वच्छ वातावरणात आणि मानवी आरोग्यास अहितकारक परिस्थितीत केली जात असल्याचा ठपका प्रशासनाने ठेवला आहे.
अन्नपदार्थांच्या साठवणुकीसंदर्भातील नियमांचे उल्लंघन झाल्याच्या कारणावरून अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. जप्त केलेल्या अन्नपदार्थांचे नमुने पुढील तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. या तपासणीत अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत काय निष्पन्न होते, याकडे आता लक्ष लागले आहे.
सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे बाजारात विक्री होणारे अन्नपदार्थ सुरक्षित, स्वच्छ आणि नियमांनुसार साठवलेले आहेत की नाहीत, याची तपासणी करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवली जात आहे.
नागरिकांनी अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत किंवा त्यांच्या साठवणुकीबाबत संशय आल्यास अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तपासणी आणि कारवाईची ही मोहीम पुढील काळातही सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.