नाशिक : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील न विसरणारा क्षण आहे. या क्षणाची प्रत्येक जण आतुरतेने वाटत बघत असतो. तसेच हा सोहळा खास होण्यासाठी सर्वच प्रयत्नशील असतात. परंतु एका आयकर अधिकाऱ्याने लग्नाच्या दिवशीच स्वत:चा शेवट केला आहे. नाशिकमधील आयकर अधिकाऱ्याने लग्नाच्या दिवशी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला आहे.
लग्नासारख्या पवित्र दिवशी आयकर अधिकाऱ्याने स्वत:चे जीवन संपवले आहे. हरेकृष्ण पांडे असं या तरुण आयकर अधिकाऱ्याचे नाव आहे. शिक्षणानंतर नोकरी करत यशस्वीपणे आयुष्यातील टप्पे पार करत पांडे यांनी लग्नाचा टप्पा पार करण्याचा निर्णय घेतला. लग्नासाठी त्यांनी जोडीदाराची निवड केली मात्र याच निवडीने त्यांचा घात केल्याचा प्रकार घडला आहे. ज्या व्यक्तीसोबत संसाराची स्वप्न पाहिली, त्याच व्यक्तीने ती भंग केली.
हेही वाचा : अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाखांपर्यंतचे कॅशलेस उपचार होणार; सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
नेमकं घडलं काय?
हरेकृष्ण पांडे यांचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा पार पडला. साखरपुड्यादिवशी सर्वत्र आनंदीआनंद पाहायला मिळाला. सर्व नातेवाईक मंडळी साखरपुड्यासाठी उपस्थित होती. त्यातच नवरीचा प्रियकर देखील उपस्थित होता. साखरपुड्यातच होणारी बायको तिच्या प्रियकरासोबत मजा, मस्ती करताना दिसली. तिथेच नवरीने तिच्या प्रियकराला घट्ट मिठी मारली. तेव्हापासूनच वादाला सुरूवात झाली.
साखरपुड्यातील सर्व प्रकारानंतर हरेकृष्ण पांडे तणावात गेले. या प्रकारानंतर होणाऱ्या बायकोने विविध प्रकारे धमकी देण्यात सुरूवात केली. सततच्या धमक्यांना आणि मानसिक त्रासाला कंटाळून पांडे यांनी कठोर पाऊल उचलले. आयकर अधिकारी पांडे यांनी लग्नाच्या दिवशीच राहत्या घरी गळफास घेतला. या घटनेनंतर लग्नघरात भयाण शांतता पसरली. तसेच परिसरात खळबळ उडाली असून नाशिकच्या अंबड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा तपास केला जात आहे.