Drug-free Nashik: नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाने 'ड्रग्जमुक्त नाशिक' मोहिमेअंतर्गत गेल्या सहा महिन्यांत अमलीपदार्थ विरोधात मोठी मोहीम राबवली आहे. या काळात अमलीपदार्थ विरोधी पथकाने तब्बल ८४ कारवाया करून ८१ जणांना अटक केली आहे. यामध्ये 314.5 ग्रॅम एमडी ड्रग्ज पावडर आणि 37 किलो गांजासह जवळपास 25 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेल्यांमध्ये सहा महिला आरोपींचा समावेश आहे. या महिला बारावी ते तेरावी शिकलेल्या असून, त्या 22 ते 25 वर्षे वयोगटातील असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
हेही वाचा: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात 29 जूनला मेगा ब्लॉक; अनेक गाड्यांच्या मार्गात बदल
शहरातील अमलीपदार्थाचा साखळीव्यवसाय मोडून काढण्यासाठी पोलिस आयुक्तालयाने गुन्हे शाखा आणि अमलीपदार्थ विरोधी पथकाला विशेष सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. कोणत्याही प्रकारे अमलीपदार्थाची खरेदी-विक्री होऊ नये यासाठी पान टपऱ्या, कॅफे तसेच इतर ठिकाणांची तपासणी सातत्याने करण्यात येत आहे.
या कारवायांमध्ये जर पोलिसांचा सहभाग आढळून आला, तर त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिला आहे. पोलिस हवालदार युवराज पाटील याच्या प्रकरणात त्यांनी बडतर्फीच्या कारवाईतून हा इशारा दिला होता.
हेही वाचा:संजय राऊतांवर केलेलं 'ते' वक्तव्य पडलं महागात; नितेश राणेंना कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी
नाशिक हे धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर आहे. अशा शहरात अमलीपदार्थांचे विळखा न बसावा यासाठी पोलिस यंत्रणा अधिक जबाबदारीने काम करत आहे. मागील दोन वर्षांपासून नाशिक एमडी ड्रग्ज विक्रीच्या घटनांमुळे चर्चेत आले आहे. त्यामुळे अमलीपदार्थाच्या अवैध धंद्यावर कायमचा आळा बसवण्यासाठी पोलिसांची ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.