रामकुंडावर ऐतिहासिक ध्वजारोहण! पंचवटीतील 11 रस्ते बंद, 72 शाळांना सुट्टी; प्रशासनाचा मोठा निर्णय

नाशिकच्या रामकुंडावर 31 ऑक्टोबरला ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा होणार आहे.
Nashik News
Nashik News

नाशिक : नाशिकमधील रामकुंडावर 31 ऑक्टोबर रोजी ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून, पंचवटी परिसरात वाहतुकीसाठी विशेष निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. भाविकांची गर्दी लक्षात घेता पंचवटीतील 11 रस्ते सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.

11 रस्त्यांवर वाहतूक निर्बंध

ध्वजारोहण सोहळ्यासाठी देशभरातून साधू-महंत, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आणि भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाला सुमारे 15 ते 20 हजार भाविक येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. मखमलाबाद नाका, मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा, रविवार कारंजा आणि मेनरोड परिसरातील व्यावसायिकांनाही आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

भाविकांसाठी 10 ठिकाणी पार्किंग

कार्यक्रमासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी शहरात 10 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. मात्र, पार्किंगच्या ठिकाणापासून रामकुंडापर्यंत पोहोचण्यासाठी भाविकांना सुमारे 2 ते 3 किलोमीटर पायी प्रवास करावा लागू शकतो. त्यामुळे नागरिकांनी वाहतूक नियोजनाची माहिती घेऊनच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

71 शाळांना सुट्टी, दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना

सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटी विभागातील 71 शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच गोदाघाट परिसरातील दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.

रामकुंडावरील ध्वजारोहणानंतर सायंकाळी महागोदा आरती होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी प्रशासनाकडून वाहतूक आणि गर्दीचे नियोजन करण्यात येत असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवली जात आहे. भाविकांनी शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा आणि प्रवासासाठी अतिरिक्त वेळ राखून ठेवावा.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version