Landslide at Harishchandragad: पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक हरिश्चंद्रगडावर एक मोठी आपत्ती ओढवली. रविवारी सुट्टीच्या दिवशी मुंबईतील मालाड भागातून 10 पर्यटकांचा गट ट्रेकिंगसाठी आला होता. दिवसभर रिमझिम पावसात भटकंती केल्यानंतर हे पर्यटक गडावरून खाली उतरत होते. आडव्या कठड्याच्या मागील बाजूस आले असता, अचानक डोंगरकडा खचून दरड थेट त्यांच्या अंगावर कोसळली. या घटनेत 2 पर्यटक मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबले गेले, तर अन्य 2 जण दगडांचा तीव्र मारा बसल्याने गंभीर जखमी झाले.
लोखंडी रेलिंग अन् स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण
दरड कोसळली त्या ठिकाणी सुरक्षेसाठी लावण्यात आलेले लोखंडी रेलिंग पर्यटकांसाठी वरदान ठरले. या रेलिंगच्या आधारामुळे हे पर्यटक खोल दरीत कोसळण्यापासून बालंबाल वाचले. सोबतच्या साथीदारांनी व एका स्थानिक नागरिकाने तातडीने वन्यजीव विभाग आणि पायथ्याशी असलेल्या ग्रामस्थांना घटनेची कल्पना दिली. माहिती मिळताच गावकऱ्यांनी तत्काळ गडाकडे धाव घेत बचावकार्य सुरू केले आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना सुरक्षित बाहेर काढून खाली आणले.
जखमींवर नाशिकमध्ये उपचार सुरू; प्रशासनाचे काळजी घेण्याचे आवाहन
अपघातातील जखमी राम प्रकाश यादव, निलेश गोमाटी विश्वकर्मा, कृष्णा कुमार साहू आणि दिनेश संजय साहू यांना सुरुवातीला राजूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुखापत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिकच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पावसाळ्यात गड-किल्ल्यांवर ट्रेकिंग करताना पर्यटकांनी खबरदारी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.