अहिल्यानगर: नेवासा शहरात सोमवारी उशिरा रात्री घडलेल्या दुर्घटनेने संपूर्ण परिसर हादरला. नगरपंचायत चौकातील मुख्य रस्त्यावर असलेल्या आठ दुकानदारांचे संसार एका क्षणात जळून खाक झाले. रात्री सुमारे 10.30 वाजता अचानक उठलेल्या ज्वाळांनी परिसरात चांगलीच घबराट निर्माण केली. काही क्षणातच सलून, मोबाईल दुकान, बॅग हाऊस, प्रसाधनालय, कोल्ड्रिंक्स सेंटर, गॅस शेगडी रिपेयरिंग शॉप, केक शॉप आणि किड्स वेअर दुकान आगीच्या भक्ष्यात पडले. आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप कोणताही ठोस निष्कर्ष समोर आलेला नाही. मात्र व्यापाऱ्यांवर या आगीने मोठा आर्थिक घाला घातला असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आग पसरताच आसपासचे नागरिक तत्काळ धावून आले आणि मदतकार्य सुरू केले. त्याचवेळी नेवासा नगरपंचायतचे अग्निशामक दल आणि ज्ञानेश्वर साखर कारखान्याच्या अग्निशामक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पोलिसांनी गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी कंबर कसली आणि परिसर रिकामा करण्यात आला. एकीकडे ज्वाळांचे तांडव सुरू असताना दुसरीकडे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
हेही वाचा: Nashik Sinnar Bus Accident : सिन्नरमध्ये भीषण अपघात! एसटी बसचा ताबा सुटून 9 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू, अनेक जखमी
अग्निशामक कर्मचाऱ्यांनी आग आवरण्यासाठी मोठा प्रयत्न केला, मात्र आग इतक्या झपाट्याने पसरली की नियंत्रण मिळवण्यास वेळ लागला. सकाळपर्यंत जळालेल्या दुकानांचे अवशेषच शिल्लक राहिले होते.
राज्यात गेल्या एका दिवसात अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडल्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अग्निशमन यंत्रणांची उपलब्धता, विद्युत तांत्रिक बिघाड, तसेच व्यापारी भागातील सुरक्षिततेची कमतरता या सर्व मुद्द्यांवर चर्चा रंगू लागली आहे. नेवासा येथील घटना या धोका किती मोठा आहे याची जाणीव पुन्हा एकदा करून देते.
हेही वाचा: Attack On Sharad Pawar Gat Member : माळेगावच्या शहराध्यक्षावर भ्याड हल्ला; सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'हा हल्ला राजकारणातून झाला...'