Nashik Sinnar Bus Accident : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर बस स्थानकावर मंगळवारी दुपारी भीषण अपघात घडला. प्रवासी बसची वाट पाहत असताना अचानक एका रोडवेज एसटी बसने नियंत्रण गमावले आणि थेट प्लॅटफॉर्मवर जोरदार धडक दिली. वेगाने आलेल्या या बसखाली अनेक प्रवासी चिरडले गेले. या हृदयद्रावक अपघातात 9 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला असून चार ते पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आला थरकाप उडवणारा क्षण
अपघाताचा संपूर्ण प्रकार बसस्थानकाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून ते दृश्य अत्यंत हादरवणारे आहेत. व्हिडिओमध्ये प्लॅटफॉर्मवर उभे असलेले महिला, पुरुष आणि लहान मुले दिसतात. दूरवरून बस जवळ येताना दिसते, पण चालक ब्रेक मारण्यात अयशस्वी ठरतो. पापणी झाकायच्या आतच बस प्लॅटफॉर्मकडे वेगाने येते आणि उभ्या असलेल्या प्रवाशांना जोरदार धडक देते. कोणालाही सावरण्याची संधी न मिळाल्याने अनेक जण जागीच कोसळतात. धडक दिल्यानंतर बस थोड्या अंतरावर मागे जाते आणि थांबते.
ब्रेक फेलमुळे अपघात?
फुटेज पाहता प्रारंभी असा संशय व्यक्त केला जात आहे की बसचे ब्रेक निकामी झाल्याने हा भीषण अपघात घडला असावा. मात्र, याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. पोलीस या प्रकरणाचा सर्व अंगांनी तपास करत आहेत.
हेही वाचा – Nagpur Leopard: नागपुरात दाट वस्तीतील घरात शिरला बिबट्या; छोट्याशा अलोकने सांगितला ‘तो’ थरारक प्रसंग
9 वर्षीय आदर्शचा मृत्यू
या अपघातात आदर्श बोराडे (वय 9) या चिमुरड्याचा मृत्यू झाला. आदर्शचे कुटुंब पंढरपूरातील विठ्ठल दर्शन आटोपून त्यांच्या दापूर-सिन्नर येथील घरी परतत होते. परंतु घरी पोहोचण्याआधीच बस स्थानकावरील या दुर्घटनेने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताचा पंचनामा करण्यात आला असून बस चालकाची चौकशी सुरू आहे.