मुंबई: मंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त राणे समर्थकांनी मुंबईतील सेनाभवन आणि मातोश्री परिसरात भव्य फलकबाजी केली आहे. या फलकांमध्ये नितेश राणेंना ‘हिंदू धर्म रक्षक’ आणि ‘हिंदू गब्बर’ असा उल्लेख करत त्यांना हिंदुत्वाचा खंदा पुरस्कर्ता म्हणून दाखवण्यात आले आहे.
या फलकांमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये संताप निर्माण झाला असून समर्थकांच्या या कृतीला उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न म्हणून पाहिलं जात आहे. बॅनरबाजीमुळे मातोश्री परिसरात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
हेही वाचा: धूप-उदबत्ती लावताना वाटतं समाधान, पण शरीरात वाढतोय 'हा' घातक आजार...वाचा संपूर्ण सत्य
सदर बॅनरबाजी काही दिवसांपूर्वी झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या भाषणाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. त्या भाषणात उद्धव ठाकरेंनी नितेश राणेंवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी राणे समर्थकांनी बॅनरच्या माध्यमातून जोरदार पवित्रा घेतल्याचं दिसत आहे.
अलीकडेच नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्व भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, त्यांच्यावर सडकून टीका केली होती. या वादामुळे शिवसेना (उ.बा.ठा.) आणि राणे गटामधील संघर्ष आणखी तीव्र झाल्याचे चित्र आहे.