मुंबई: राज्यातील ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या वादाने आता उग्र राजकीय वळण घेतले असून मनोज जरांगे यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे आता ओबीसी नेते नागनाथ हाके यांनी थेट प्रत्युत्तर दिलं आहे.
नागनाथ हाके म्हणाले की, 'मूळ ओबीसी समाजाच्या सामाजिक न्याय हक्काच्या आड कोणी येत असेल, तर आम्हाला एकजूट होणं भाग आहे. जरांगे यांच्या वक्तव्यांमुळे विधानसभेला किंमत त्यांनाच मोजावी लागेल.' त्यांनी स्पष्ट इशारा दिला की जर ओबीसीच्या हक्कांवर गदा आली, तर ती ओबीसी समाज सहन करणार नाही.
हेही वाचा: गणपतीत कोकणात जायचंय? समुद्रमार्गे जलद आणि त्रासमुक्त प्रवासाची नवी सुविधा
ओबीसींमध्ये एकी निर्माण करण्यासाठी लवकरच लॉग मार्च काढण्यात येणार असल्याचंही हाके यांनी जाहीर केलं. 'ही वेळ आहे खरी ओबीसी ओळखण्याची. आम्ही सर्व राजकीय पक्षांना सांगतोय, की खऱ्या ओबीसी नेत्यांना तिकीट द्या. अन्यथा आम्ही मत देणार नाही,' असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
मनोज जरांगे यांचे अजित पवारांवर हालचाल करताना केलेले वादग्रस्त विधान 'अजित दादांना किंमत मोजावी लागेल,' यावर प्रतिक्रिया देताना हाके म्हणाले, 'जरांगे यांनी काय नेता नेमला? पांचट बोलणारा' अशा शब्दांत त्यांनी जरांगेंवर टीका केली.
या सगळ्या घडामोडींचा थेट परिणाम आगामी विधानसभा निवडणुकांवर होणार असल्याचं जाणकारांचे म्हणणं आहे. एका बाजूला मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा लढा उग्र होत असतानाच, दुसऱ्या बाजूला ओबीसी नेतेही आपले हक्क जपण्यासाठी रणशिंग फुंकताना दिसत आहेत.
ओबीसी आणि मराठा समाजातील हा संघर्ष सध्या केवळ आंदोलनापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर त्याचा राजकीय परिणाम निश्चित दिसून येत आहे. आता पाहावे लागेल, की या वादातून कोणता नेता सावरतो आणि कोणाला याचे राजकीय नुकसान सहन करावे लागते.