मुंबई: गणपती हा कोकणातील लोकांसाठी अत्यंत भावनिक आणि महत्त्वाचा सण मानला जातो. या काळात मुंबई आणि इतर शहरांतून लाखो चाकरमानी कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी प्रवास करतात. मात्र दरवर्षी रेल्वे, बस आणि खाजगी वाहनांच्या तुडुंब गर्दीमुळे अनेकांना वेळेत पोहोचणे कठीण होते. यावर तोडगा म्हणून यंदा समुद्र मार्गे कोकणात प्रवास करण्याची नवी सुविधा उपलब्ध होणार आहे.
मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी यासाठी पुढाकार घेतला असून, मुंबईतील माझगावपासून मालवण, विजयदुर्ग आणि रत्नागिरीपर्यंत जलवाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही सेवा गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर खास चाकरमान्यांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
हेही वाचा: App-Based Taxi Service: अॅप-आधारित टॅक्सी सेवांसाठी नवे नियम लागू; फेरी रद्द करणाऱ्यांना दंड भरावा लागणार
ही जलवाहतूक सेवा एम टू एम या आधुनिक बोटीमार्फत सुरू होणार असून, या बोटींमध्ये हायटेक यंत्रणा, प्रवाशांसाठी आरामदायी व्यवस्था आणि सुरक्षिततेची पूर्तता करण्यात आली आहे. या बोटींच्या माध्यमातून मुंबईहून मालवण आणि विजयदुर्गला अवघ्या साडेचार तासांत पोहोचता येणार आहे, तर रत्नागिरी अवघ्या तीन तासांत गाठता येणार आहे.
यामुळे चाकरमान्यांचा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि त्रासविहीन होणार आहे. एकीकडे सडकेच्या मार्गांवर होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांची शक्यता कमी होणार असून, दुसरीकडे प्रवासात लागणारा वेळही मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. या सेवेमुळे कोकणात पर्यटनालाही चालना मिळण्याची शक्यता आहे.
या निर्णयाबद्दल मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, 'कोकणातील चाकरमान्यांना वेळेत आणि सुखरूप गावी पोहोचवणे हे आमचं उद्दिष्ट आहे. समुद्रमार्गे प्रवास हा केवळ पर्याय नाही, तर भविष्यातील वाहतुकीचं महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे.'
ही सेवा कधीपासून सुरू होणार, बुकिंग कशी करायची आणि तिकीटदर काय असणार यासंदर्भातील अधिक माहिती लवकरच जाहीर होणार आहे. त्यामुळे यंदाचा गणपतीसण कोकणात अधिक सहज आणि आनंददायी होणार आहे, हे निश्चित.