Eknath Shinde reaction On Pakistan ceasefire violation
Edited Image
मुंबई: भारत आणि पाकिस्तानमध्ये शनिवारी युद्धबंदी करार झाला. मात्र, केवळ काही तासातचं पाकिस्तानने शस्त्रबंदीचं उल्लंघन केलं. आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाकिस्तानबाबत मोठे वक्तव्य केले आहे. 'पाकिस्तान कुत्र्याच्या शेपटीसारखा वाकडा आहे. जर त्याने त्याच्या कारवाया थांबवल्या नाहीत तर पंतप्रधान मोदी त्याचे शेपूट कापून टाकतील. पाकिस्तानच्या हेतूंवर विश्वास ठेवता येत नाही, म्हणूनच युद्धबंदी आणि पाकिस्तान-अमेरिका घोषणेनंतरही पंतप्रधान मोदींनी ट्विट केले नाही किंवा कोणतीही टिप्पणी केली नाही,' असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तानची ही कृती बेईमान आहे -
एकनाथ शिंदे यांनी पुढे म्हटलं आहे की, 'दोन्ही देशांच्या संमतीने युद्धबंदी झाली होती. भारत नेहमीच आपल्या वचनबद्धतेचे पालन करतो. पण पाकिस्तानची ही कृती बेईमान आहे. याआधीही पाकिस्तानने अनेक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांना सुधारण्याची संधी दिली पण मला वाटत नाही की ते सुधारतील. पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर मिळाले आहे. आमचे सैन्य पूर्णपणे सज्ज आहे.'
युद्ध झाल्यास पाकिस्तानचा पराभव होणार -
वारंवार केलेल्या दुष्कृत्यांनंतर पाकिस्तानला धडा शिकवला जाईल. भारत इतका शक्तिशाली आहे की तो त्याला प्रत्युत्तर देईल. पाकिस्तानला माहित आहे की जर ते भारताशी लढले तर ते हरतील, असा दावाही यावेळी एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
हेही वाचा - अंगावरील हळद उतरण्यापूर्वी जवान प्रज्वल रुपनर देशसेवेसाठी रवाना; मुस्लिम बांधवांनी सत्कार करत दिल्या शुभेच्छा
दरम्यान, आज सकाळी भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर शांतता असून पाकिस्तानकडून अद्याप कोणत्याही हल्ल्याची बातमी आलेली नाही. राजस्थान, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित झाली असून लोक सामान्य जीवनाकडे वाटचाल करत आहेत. तथापि, सुरक्षा दल पूर्णपणे सतर्क आहेत आणि प्रत्येक लहान-मोठ्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.
हेही वाचा - मुंबईत फटाके फोडण्यावर बंदी; पाककडून होत असलेल्या हल्ल्यांमुळे प्रशासनाचा मोठा निर्णय
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचा बदला घेतला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली होती. ज्यामुळे पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली होती. त्यानंतर शनिवारी दोन्ही देशामध्ये युद्धविराम घोषीत करण्यात आला आहे. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानचे कौतुक केले.