Thursday, July 17, 2025 03:08:27 AM

Palghar: चक्क! मृत अर्भकाला घेऊन कुटुंबाने केला 70 किलोमीटरचा प्रवास

मृत नवजात अर्भकाला प्लास्टिकच्या पिशवीत घेऊन कुटुंबीयांनी तब्बल 70 किलोमीटरचा प्रवास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पालघरच्या मोखाडा तालुक्यात समोर आली आहे.

palghar चक्क मृत अर्भकाला घेऊन कुटुंबाने केला 70 किलोमीटरचा प्रवास

पालघर: मृत नवजात अर्भकाला प्लास्टिकच्या पिशवीत घेऊन कुटुंबीयांनी तब्बल 70 किलोमीटरचा प्रवास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पालघरच्या मोखाडा तालुक्यात समोर आली आहे.

मोखाडा तालुक्यातील गर्भवती महिला अविता सखाराम कवर हिला मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास प्रसूती कळा होऊ लागल्या. यानंतर 108 क्रमांकाला संपर्क साधल्यानंतर देखील दुपारी बारा वाजेपर्यंत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने या कुटुंबीयांनी खाजगी वाहनाने या गर्भवती मातेला खोडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी दाखल केले. खोडाळा या ठिकाणी देखील वेळेत उपचार न मिळाल्याने तिला नाशिक येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आलं. 

हेही वाचा : Coronavirus Update: राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 914 वर

दरम्यान नाशिक रुग्णालयात पोहचण्याआधीच मातेच्या गर्भाशयातील बाळाचा मृत्यू झाला असून घरी परतण्यासाठी रुग्णवाहिका न मिळाल्याने कवर कुटुंबाने मृत बाळाला प्लास्टिकच्या पिशवी घेऊन आपलं राहतं घर गाठलं. या धक्कादायक घटनेनंतर पालघरच्या जव्हार मोखाडा भागातील आरोग्य विभागाचे भीषण वास्तव पुन्हा समोर आले. मागील काळात देण्यात आलेल्या रुग्णवाहिका रुग्णसेवेत वेळेत उपलब्ध होत नसल्याचा आरोप शरद पवार गटाचे माजी आमदार सुनील भुसारा यांनी केला आहे. तर या गर्भवती मातेची वेळोवेळी तपासणी करण्यात आली असून गर्भाशयातील बाळाचा मृत्यूची माहिती प्रशासनाला झाली होती . मात्र नाशिकहून परतताना त्यांनी प्लास्टिकच्या पिशवीत मृत बाळाला आणल्याची माहिती आमच्याकडे नसल्याचं सांगत पालघर आरोग्य विभागाने या प्रकरणात हात झटकण्याचं काम केलं आहे.


सम्बन्धित सामग्री