पंढरपूर: भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून, पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आज तिरंगी फुलांच्या सजावटीने उजळून निघाले आहे. सावळ्या विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेल्या हजारो भाविकांना आज विठ्ठलाच्या रूपासोबतच देशाभिमानाचे एक वेगळेच दर्शन घडत आहे.
तिरंगी फुलांची कल्पक आरास
मंदिर समितीने अत्यंत कल्पकतेने मंदिराच्या कानाकोपऱ्यात ही सजावट केली आहे. विठ्ठलाचा मुख्य गाभारा, त्याबाहेरील ऐतिहासिक चौखांबी आणि सोळखांबी मंडप जणू तिरंग्याच्या रंगात मिसळून गेले आहेत. केवळ मुख्य मंदिरच नव्हे, तर रुक्मिणी मातेचा गाभारा, नामदेव पायरी आणि व्हीआयपी गेटपर्यंत फुलांच्या माळांची कलाकुसर करण्यात आली आहे. भगवा, पांढरा आणि हिरवा अशा तीन रंगांच्या फुलांचा वापर करून केलेली ही सजावट भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे.
हेही वाचा: Padma Awards: पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री यामध्ये काय आहे फरक? जाणून घ्या पुरस्कारांची पूर्ण माहिती
विठुरायाला तिरंगी फुलांचे हार
या सजावटीचे मुख्य आकर्षण म्हणजे स्वतः श्री विठ्ठल आणि रुक्मिणी माता. आज देवाच्या गळ्यातही तिरंगी फुलांच्या आकर्षक माळा परिधान करण्यात आल्या आहेत. नुकताच वसंत पंचमीला विठ्ठल-रुक्मिणीचा विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला होता; त्या मंगलमयी वातावरणांनंतर आता प्रजासत्ताक दिनाच्या या उत्सवी सजावटीने मंदिराचे चैतन्य द्विगुणित झाले आहे. "भक्ती आणि शक्तीचा" हा अनोखा संगम आज पंढरीत पाहायला मिळत आहे.
भाविकांची मांदियाळी आणि मंदिर प्रशासनाची सज्जता
सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पंढरपुरात भाविकांचा ओघ प्रचंड वाढला आहे. चंद्रभागा आणि मंदिराचा परिसर भक्तांच्या गर्दीने फुलून गेला आहे. वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाने दर्शन रांगेचे चोख नियोजन केले असून, सुरक्षेच्या दृष्टीनेही सर्व पावले उचलली आहेत. 'विठ्ठल दर्शनासोबतच राष्ट्रभक्तीची ही अनोखी भेट' असल्याचे मत अनेक भाविकांनी व्यक्त केले आहे.
धार्मिक स्थळांवरही राष्ट्रभक्तीचा रंग
देशभरात 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, भारतातील प्रमुख धार्मिक स्थळांनीही यात आपला सहभाग नोंदवला आहे. पंढरपूरचे मंदिर हे केवळ आध्यात्मिक केंद्र न राहता, आज ते राष्ट्रप्रेमाचे प्रतीक बनले आहे. फुलांच्या या सुगंधात आणि 'विठ्ठल विठ्ठल' च्या गजरात आज 'जय हिंद'चा नादही घुमतोय, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
हेही वाचा: Shirdi Saibaba Temple: श्रद्धेला सीमा नाही! अमेरिकेतील भक्ताकडून साईचरणी एक कोटीचा मुकुट अर्पण