पंढरपूर: “टाळी वाजवावी, गुढी उभारावी… वाट ही चालावी पंढरीची!” या अभंगाच्या ओळींचा प्रत्यय आज पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात येत आहे. आज चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा! साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या मंगलदिनी हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अवघी पंढरी सज्ज झाली आहे. पहाटेपासूनच चंद्रभागेच्या तीरावर विठूरायाच्या दर्शनासाठी भक्तांचा महासागर लोटला असून, चंद्रभागेत स्नान करून सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी वारकरी मोठ्या श्रद्धेने मंदिरात दाखल होत आहेत. विठुरायाचे लोभस रूप आणि मंदिरातील मंगलमय वातावरण भक्तांच्या मनाला सुखावून जात आहे.
आजच्या या खास दिनाचे औचित्य साधून विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात नयनरम्य फुलांची आरास करण्यात आली आहे. रांजणगाव गणपतीचे विठ्ठल भक्त नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील यांनी ही सेवाभावी तत्त्वावर फुलांची सजावट केली आहे.
या सजावटीसाठी रंगांच्या आणि सुगंधाच्या विविध छटांचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये पिंक डेझीचे 250 बंडल, व्हाईट शेवंतीच्या 800 काड्या, गुलाबाचे 50 बंडल आणि कामिनीचे 300 बंडल वापरले गेले आहेत. याव्यतिरिक्त झेंडू, अस्टर, गोंडा आणि जिप्सो अशा क्विंटलभर फुलांच्या रंगसंगतीने मंदिराचा कोनान् कोना उजळून निघाला आहे. पुण्याच्या 15 कारागिरांनी रात्रभर परिश्रम घेऊन ही ‘पुष्पवाटिका’ मंदिरात साकारली आहे.
चैत्र पाडव्याचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे विठुरायाची ‘चंदन उटी’ पूजा. वाढत्या उन्हाचा चटका देवाला जाणवू नये आणि शीतलता मिळावी, या भावनेतून विठूराया आणि रखुमाईला आजपासून सुगंधी चंदनाचा लेप लावण्यास सुरुवात झाली आहे. या संदर्भातील माहिती जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांनी दिली आहे.
मंदिर समितीचे व्यवस्थापक संदेश भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ऐतिहासिक चंदन उटी पूजेचा प्रारंभ आजच्या शुभमुहूर्तावर करण्यात आला. सावळ्या विठ्ठलाच्या शरीरावर चंदनाचा उटी लेप, अंगावर पारंपरिक सुवर्णालंकार, गळ्यात साखरेची गाठ आणि डोक्यावर जरतारी पागोट्यामुळे विठुरायाचे रूप अधिकच सात्विक आणि लोभस दिसून येत आहे.
आजच्या दिवशी केवळ मंदिराची सजावटच नाही, तर मंदिरातील धर्मध्वजाचेही विधिवत पूजन करण्यात आले. मराठी नववर्षाचा हा पहिला दिवस साजरा करण्यासाठी जालना, धाराशिव आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक पंढरीत आले आहेत. “दरवर्षी आम्ही पाडव्याला विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक व्हायला येतो, इथली सजावट आणि विठ्ठलाचे रूप पाहून वर्षभराचा थकवा जातो आणि मनाला प्रचंड समाधान मिळते,” अशा भावना भाविकांनी व्यक्त केल्या आहेत.
भक्तांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मंदिर समितीने काही महत्त्वाचे बदल केले आहेत. दर्शन व्यवस्था जलद आणि सुलभ व्हावी या उद्देशाने आज ‘ऑनलाइन दर्शन पास’ बुकिंग बंद ठेवण्यात आली आहे. तसेच, व्हीआयपी दर्शनावरही निर्बंध घालण्यात आले असून सर्व सामान्यांना विठुरायाचे दर्शन सहज मिळावे, यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. भक्ती, सुगंध आणि श्रद्धेचा असा त्रिवेणी संगम आज पंढरीत पाहायला मिळत असून, विठूरायाचा हा दरबार खऱ्या अर्थाने मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी तेजोमय झाला आहे.