Sunday, June 15, 2025 10:58:45 AM

धक्कादायक! पनवेलमध्ये महिला पोलिसावर पाच वर्षे सहकाऱ्याद्वारे लैंगिक अत्याचार; पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

पनवेलमधील महिला पोलीस कर्मचाऱ्यावर पाच वर्षे गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार. आरोपी खुद्द पोलीस उपनिरीक्षक. Atrocity Act अंतर्गत गुन्हा दाखल.

धक्कादायक पनवेलमध्ये महिला पोलिसावर पाच वर्षे सहकाऱ्याद्वारे लैंगिक अत्याचार पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

पनवेल: नवी मुंबईतील पनवेल शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि अस्वस्थ करणारी घटना समोर आली आहे. समाजातील सुरक्षेची जबाबदारी वाहणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यावरच गुंगीचे औषध देऊन पाच वर्षांपासून लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार समोर आली आहे. आरोपी कोणताही सामान्य व्यक्ती नसून स्वतः पोलीस उपनिरीक्षक असल्याचे उघड झाले आहे.

या प्रकरणात पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्याने पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आरोपी पोलीस उपनिरीक्षक कृष्णा कुटे आणि त्याची आई इंदुबाई कुटे यांच्यावर बलात्कार व अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (Atrocity Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, 2020 साली नेरे परिसरात गुंगीचे औषध देऊन आरोपीने पीडितेवर प्रथमच लैंगिक अत्याचार केला. त्यावेळी तिचे अर्धनग्न फोटो काढून ठेवण्यात आले आणि त्याचा वापर करून पुढील पाच वर्षांपासून धमकी देत सातत्याने अत्याचार सुरू ठेवण्यात आले. लग्नाचे आमिष दाखवून आणि फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवत पीडितेला मानसिकदृष्ट्या त्रस्त करण्यात आले.

हेही वाचा: स्मशानातील सोनं आणि अस्थी गायब झाल्याने खळबळ; नाशिकच्या नामपूरमध्ये धक्कादायक घटना

या अत्याचाराच्या कारस्थानात केवळ आरोपी पोलीस उपनिरीक्षकच नव्हे, तर त्याची आई इंदुबाई कुटे हिचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. तिने पीडितेला जातीवाचक शिवीगाळ केली, ज्यामुळे तिच्यावर दुहेरी अन्याय झाला.

एकीकडे महिला सुरक्षेसाठी उपाययोजना आणि पोलीस दलातील महिलांचा सन्मान यावर सरकार आणि प्रशासन लक्ष केंद्रीत करत असताना, दुसरीकडे पोलीस दलातीलच एका अधिकारी कडून असे अत्याचार घडणे म्हणजे संपूर्ण यंत्रणेसाठी काळीमा आहे.

सध्या पनवेल तालुका पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून, आरोपीवर कायदेशीर कारवाई सुरू आहे. मात्र या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की, ‘रक्षकच जर भक्षक झाले तर सामान्य माणसाने न्यायाची अपेक्षा कुणाकडून ठेवावी?’

या घटनेमुळे पोलीस खात्याच्या नैतिकतेवर आणि महिला सुरक्षेच्या दाव्यांवर मोठा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. अशा घटनांमध्ये पीडित महिलांनी धैर्याने पुढे येऊन तक्रार करणे ही सामाजिक सजगतेची गरज बनली आहे. या प्रकरणाला न्याय मिळावा आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, हीच आता सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.


सम्बन्धित सामग्री