परळी: ज्या खुर्चीवर बसून सामान्यांच्या व्यथा जाणून घेणे आणि प्रशासकीय पारदर्शकता जपणे अपेक्षित होते, त्याच खुर्चीचा वापर 'अर्थपूर्ण' तडजोडींसाठी करणाऱ्या परळीच्या तहसीलदाराचे पितळ अखेर उघडे पडले आहे. परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau, ACB) लाचखोरीच्या प्रकरणात बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई केवळ एका अटकेपुरती मर्यादित राहिली नसून, मुंडे यांच्या नांदेडमधील निवासस्थानी झालेल्या झाडाझडतीत भ्रष्टाचाराच्या कमाईचे धागेदोरे हाती लागले आहेत.
या संपूर्ण प्रकरणाची नांदी एका 'सालन्सी प्रमाणपत्रा'वरून (Solvency Certificate) झाली. एका तक्रारदाराचे अडकलेले काम मार्गी लावण्यासाठी तहसीलदार मुंडे यांनी 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. प्रशासकीय दिरंगाईचा अडसर दूर करण्यासाठी अखेर 20 हजार रुपयांवर तडजोड झाली. मात्र, लाच देणे हा गुन्हा मानणाऱ्या तक्रारदाराने एसीबीचे उंबरठा झिझवला. मुंडे हे चतुर अधिकारी असल्याने त्यांनी सापळ्याच्या वेळी तक्रारदाराच्या हालचालीवर संशय घेऊन पैसे स्वीकारण्याचे टाळले होते, पण 'कायद्याचे हात लांब असतात' या उक्तीप्रमाणे एसीबीने तांत्रिक पुरावे आणि संकलित माहितीच्या जोरावर मुंडे यांना विळख्यात घेतलेच.
हेही वाचा: Gold-Silver Measurement: सोनं कॅरेटमध्ये आणि चांदी किलोमध्येच का मोजली जाते? जाणून घ्या या मापनामागचं खरं कारण
मुंडे यांच्या अटकेनंतर एसीबीच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत त्यांच्या नांदेड येथील 'यशोविहार कॉलनी'तील निवासस्थानी धाड टाकली. परळीतील निवासस्थानी काहीही संशयास्पद आढळले नसले तरी, नांदेडच्या घराची झडती घेताना पथकाचे डोळे विस्फारले. येथून तब्बल 13 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये एक तोळ्याची मिनी गंठण, सहा तोळ्यांच्या पाटल्या, पाच तोळ्यांचे कडे आणि एक तोळ्याचे मंगळसूत्र अशा मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. याशिवाय, घरातून 55 हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली असून, मुंडे यांच्या अंगझडतीत यापूर्वीच 80 हजार रुपये सापडले होते.
व्यंकटेश मुंडे यांच्यावरील या कारवाईमुळे संपूर्ण बीड आणि नांदेड जिल्ह्यासह राज्यातील महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. भ्रष्टाचाराच्या या वाळवीने प्रशासकीय यंत्रणा किती पोखरली आहे, याचे हे विदारक दर्शन आहे. एसीबीच्या सातत्यपूर्ण कारवायांनी लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असले तरी, आजही सरकारी कार्यालयांत सर्वसामान्यांची अडवणूक करून पैशांची मागणी होण्याचे 'भीषण वास्तव' कायम आहे. 'कुंपणच शेत खाऊ लागल्यावर' दाद कोणाकडे मागायची, असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने व्यंकटेश मुंडे यांच्या विरोधात लोकसेवक भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. जप्त करण्यात आलेली मालमत्ता त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा जास्त आहे का, याचाही सखोल तपास आता केला जाणार आहे. मुंडे यांची ही 'भ्रष्टाचाराची लंका' आणखी किती खोलवर रुजलेली आहे, हे आगामी तपासात स्पष्ट होईलच. मात्र या कारवाईने भ्रष्ट मार्गाने माया जमवणाऱ्या अधिकाऱ्यांना कडक इशारा दिला आहे.
हेही वाचा: Mumbai Record Breaking AQI: मुंबईचा 'गॅस चेंबर' होतोय का? मागील सात वर्षांतील प्रदूषणाचे सर्व रेकॉर्ड मोडले; 'हा' आकडा वाचून तुमची धडकी भरेल