Thursday, November 13, 2025 01:59:17 PM

Phaltan Doctor Case: अजितदादांना भिडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याकडे फलटण प्रकरणाचा तपास द्या, शरद पवार गटाची मागणी

फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणावरून राज्यात राजकीय तापमान चढले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते मेहबूब शेख यांनी एसआयटी स्थापन न केल्याबद्दल फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

phaltan doctor case अजितदादांना भिडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याकडे फलटण प्रकरणाचा तपास द्या शरद पवार गटाची मागणी
 

मुंबई : फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणावरून राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते मेहबूब शेख यांनी राज्य सरकारवर थेट निशाणा साधला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना, “विरोधी पक्षाच्या नेत्यावरील खोट्या विनयभंग प्रकरणात एसआयटी स्थापन करणारे फडणवीस फलटण प्रकरणात मात्र एसआयटी का नेमत नाहीत?” असा प्रश्न उपस्थित केला आहे. मेहबूब शेख यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत या प्रकरणावर गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितले की, मृत महिला डॉक्टरविरोधात केवळ एका महिन्यात तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तक्रार केली होती, आणि त्या तक्रारींच्या मागे कोणाचा दबाव होता, याची चौकशी झाली पाहिजे. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट घेण्याची मागणी शेख यांनी केली.

त्यांच्या म्हणण्यानुसार, “महिला डॉक्टरने डीवायएसपी राहुल धस यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर अचानक ती चुकीची ठरवली गेली, हा प्रकार संशयास्पद आहे.” डॉक्टरच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी तपासाची मागणी केली आहे. मात्र, ती मागणी मान्य होत नसल्याने शरद पवार गट आक्रमक झाला आहे. मेहबूब शेख म्हणाले, “बीडमध्ये एका खोट्या प्रकरणात फडणवीसांनी एसआयटी स्थापन करून 350 महिलांचे जबाब घेतले. मग फलटणमध्ये एका महिला डॉक्टरचा मृत्यू झाल्यावर एसआयटी का नाही? लोकांवर दबाव आणणारे आणि तिला आत्महत्येला प्रवृत्त करणारे दोषी अजूनही मोकाट आहेत.”

हेही वाचा: Monorail Accident in Mumbai: मुंबईत मोनोरेलचा अपघात! चाचणीदरम्यान डबा रुळावरून घसरला; मोठी दुर्घटना टळली

त्याचबरोबर त्यांनी अजित पवारांवरही टीका केली. शेख म्हणाले, “अजित पवारांनी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यावर दबाव आणला होता, तरीही त्यांनी मागे हटण्यास नकार दिला. त्यामुळे त्या अधिकाऱ्यांना या प्रकरणाचा तपास प्रमुख बनवावे.” त्यांनी पुढे म्हटले की, “अंजना कृष्णा या अत्यंत प्रामाणिक, निडर आणि निष्पक्ष अधिकारी आहेत. त्यांनी पूर्वी अनेक संवेदनशील प्रकरणांमध्ये प्रामाणिक तपास केला आहे, त्यामुळे फलटण प्रकरणातही सत्य बाहेर आणण्याची त्यांची क्षमता निश्चित आहे.”

या प्रकरणात शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील सरकारवर निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, “या प्रकरणात दोन आरोपींना अटक झाली असली तरी प्रमुख आरोपींची नावे आरोपपत्रात नाहीत. डीवायएसपी राहुल धस, एपीआय जायपात्रे, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे पीए शिंदे आणि नागटिळक, पोलीस उपनिरीक्षक पाटील आणि मेडिकल अधिकारी अंशुमन धुमाळ यांच्यावर आरोपपत्र दाखल का झाले नाही?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या की, “जर ज्या लोकांवर संशय आहे त्यांची नावेच आरोपपत्रात नसतील, तर मुलीच्या कुटुंबाने दिलेला जबाब अर्थहीन ठरतो.” त्यांनी स्पष्ट मागणी केली की, या सहा जणांवर तातडीने आरोपपत्र दाखल करून चौकशी सुरू करावी.

दरम्यान, फलटण प्रकरणातील आरोपांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. एकीकडे मृत महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याची मागणी होत आहे, तर दुसरीकडे पोलिसांवर आणि राजकीय नेत्यांवर निष्क्रियतेचे आरोप होत आहेत. आता या प्रकरणात एसआयटी स्थापन होते की नाही, याकडे राज्याचे आणि संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: New Pension Rule: कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती आणि कुटुंब पेन्शनमधील गोंधळ संपला! केंद्र सरकारने जारी केले नवीन पेन्शन नियम


सम्बन्धित सामग्री