Pimpri Chinchwad Election : मतदार यादीत मोठ्या चुका! 1261 मतदारांची नावंच नाहीत, मतदारांच्या प्रभागांमध्येही बदल

माजी नगरसेवक पंकज भालेकर यांनी याला नियोजनबद्ध फेरफार म्हटले आहे. विविध प्रभागांतून मोठ्या प्रमाणात हरकती नोंदवल्या जात असून महापालिकेने चौकशी सुरू केली आहे.

Pimpri Chinchwad Election : मतदार यादीत मोठ्या चुका! 1261  मतदारांची नावंच नाहीत, मतदारांच्या प्रभागांमध्येही बदल

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीत गंभीर चुका उघड झाल्याने मोठी खळबळ माजली आहे. प्रभाग क्रमांक 12 मधील तब्बल 1261 मतदारांची नावे अचानक गायब झाल्याचे समोर आले असून, ही नावे थेट प्रभाग क्रमांक एक मध्ये टाकण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक पंकज भालेकर यांचेही नाव यादीतून वगळले गेले आहे. त्यांच्या नावाच्या गायब झाल्यामुळे त्यांनी निवडणूक विभागावर गंभीर आरोप करत तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे.

2024 च्या विधानसभा मतदार यादी आणि सध्याच्या प्रभागनिहाय यादीतील विसंगती दाखवत भालेकर यांनी, “हे सर्व नियोजनबद्धरीत्या केले गेले असून, निवडणूक विभागाला हाताशी धरून मतदारसंख्येचा फेरफार करण्यात आला,” असा आरोप केला. प्रभाग 12 मधून उमेदवारीची त्यांची इच्छा असताना हा प्रकार जाणीवपूर्वक केल्याचे ते म्हणाले. भालेकर यांनी 2017 च्या पालिका निवडणुकीचा उल्लेख करत, “त्या वेळी मला 1800 मतांनी विजय मिळाला होता. आज याद्यांमध्ये फेरफार करून जवळपास 1200 मतांचे अस्तित्वच बदलले आहे. हा निवडणूक परिणामावर परिणाम करण्याचा डाव नाही का?” असा थेट सवाल उपस्थित केला.

हेही वाचा: Mumbai Weather Update: एकीकडे थंडी तर दुसरीकडे हवा प्रदूषित; मुंबईकरांची तारेवरची कसरत

नवीन यादी जाहीर होताच इतर प्रभागांमधूनही अशाच प्रकारच्या चुका बाहेर येऊ लागल्या. चुकीची नावे, गायब नोंदी आणि विनाकारण प्रभागांत स्थलांतरित केलेले मतदार यामुळे नागरिक संतप्त आहेत. फक्त पहिल्याच दिवशी महापालिकेला 17 हरकती प्राप्त झाल्या. यापैकी फ क्षेत्रीय कार्यालयात तीन, ह क्षेत्रीय कार्यालयात 13 आणि क क्षेत्रीय कार्यालयात एक हरकत दाखल झाली. चिखली प्रभाग क्रमांक एक मध्ये तर पूर्णानगर, कृष्णानगर आणि घरकुल परिसरातील मतदारांची नावे प्रभाग 11 मध्ये हलवण्यात आल्याची चर्चा आहे. त्याचवेळी इतर प्रभागांतील मोठ्या प्रमाणात मतदार प्रभाग एक मध्ये टाकल्याने या प्रभागातील मतदारसंख्या 74,340 पर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे.

मोरेवस्तीतील सामाजिक कार्यकर्त्या योगिता रणसुभे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे प्रभाग एक ऐवजी 11 मध्ये टाकल्याने राष्ट्रवादीचे शहर मुख्य सरचिटणीस विनायक रणसुभे यांनी नाराजी व्यक्त केली. “प्रत्यक्ष ठिकाणी पडताळणी न करता याद्या तयार केल्याने हा गोंधळ झाला,” असे त्यांनी म्हटले. नागरिकांनी आणि राजकीय प्रतिनिधींनी निवडणूक विभागाकडे तातडीने त्रुटी दुरुस्तीची मागणी केली आहे. तर महापालिकेने या सर्व प्रकरणाची प्राथमिक चौकशी सुरू केल्याची माहिती मिळते. आगामी निवडणुकांच्या पारदर्शकता आणि विश्वासार्हतेवर या गोंधळाचा थेट परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Cyber Fraud : 1000 कोटींच्या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश, पोलिसांची मोठी कारवाई, नेमकं काय घडलं?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number