Sunday, November 16, 2025 11:38:52 PM

PM Kisan Yojana: आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात

पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पात्र शेतकऱ्यांना 2,000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार असून सरकारने तयारी सुरू केली आहे.

pm kisan yojana आनंदाची बातमी पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात

PM Kisan Yojana: देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा 21 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात या हप्त्याची रक्कम पात्र शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. केंद्र सरकारने यासाठी राज्य सरकारांना आवश्यक तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

योजनेचा उद्देश आणि लाभ
केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला वर्षभरात 6,000 रुपयांची मदत दिली जाते. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये, म्हणजे प्रत्येकी 2,000 रुपये, थेट त्यांच्या खात्यात जमा केली जाते. सध्या देशभरातील 10 कोटींपेक्षा अधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत.

हेही वाचा: State Election Commission: मतदार यादीतील दुबार नावे तपासणार राज्य निवडणूक आयोग, पारदर्शक निवडणुकांसाठी मोहीम सुरू

21 वा हप्ता कधी मिळणार?
सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, दिवाळीपूर्वी निधी मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र आता अंदाज आहे की, बिहार निवडणुकांपूर्वी म्हणजे 6 नोव्हेंबरच्या आत हप्ता वितरित केला जाईल. अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी केंद्र सरकारने संबंधित राज्यांना प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

केंद्रीय कृषीमंत्र्यांचे निर्देश
केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सर्व राज्यांना ई-केवायसी, आधार लिंकिंग आणि जमीन नोंदींची पडताळणी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांनी सांगितले की, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वेळेत पोहोचावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अपूर्ण कागदपत्र असलेल्या शेतकऱ्यांनाही हप्ता मिळावा यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.

काही राज्यांमध्ये निधी आधीच जमा
पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातील काही शेतकऱ्यांना सप्टेंबर महिन्यातच हप्ता मिळाला आहे. जम्मू-काश्मीरमध्येही सुमारे 8.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 171 कोटी रुपये जमा करण्यात आले. त्यामुळे उर्वरित राज्यांमध्ये आता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निधी हस्तांतरित होण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा: Pune University Flyover: युनिव्हर्सिटी चौकातील उड्डाणपूल प्रकल्प पूर्णतेकडे; प्रवाशांना मिळणार दिलासा

या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही
ज्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला नाही किंवा बँक तपशील चुकीचे आहेत अशा शेतकऱ्यांना या टप्प्यात हप्ता मिळणार नाही. राज्य सरकारांना पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांची यादी केंद्राकडे पाठवण्याचे आदेश दिले आहेत.

आचारसंहितेचा परिणाम नाही
सध्या बिहारमध्ये निवडणूक आचारसंहिता लागू असली तरी पीएम किसानसारख्या सुरू असलेल्या योजनांवर त्याचा परिणाम होणार नाही. त्यामुळे सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यास, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपयांचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे.

 


सम्बन्धित सामग्री