Mumbai One Ticket: मुंबईत दररोज रोज लाखो लोक प्रवास करतात. आता त्यांचा हा प्रवास अधिक सोपा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ‘मुंबई वनटिकट’ (Mumbai One Ticket) हे एकात्मिक मोबिलिटी अॅप लाँच केले, ज्यामुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ऐतिहासिक बदल घडणार आहेत. या अॅपमुळे आता मुंबईकरांना बस, लोकल ट्रेन, मेट्रो, मोनोरेल आणि नवी मुंबई मेट्रो या सर्व वाहतुकीच्या माध्यमांसाठी वेगवेगळी तिकिटे घ्यावी लागणार नाहीत. एकाच अॅपवरून एकच तिकीट बुक करून प्रवास करता येणार आहे. हे अॅप ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) प्लॅटफॉर्मवर आधारित असून, शहरातील सर्व प्रमुख वाहतूक सेवा एकाच डिजिटल नेटवर्कवर आणल्या गेल्या आहेत. त्यामुळे प्रवास अधिक सुलभ, वेगवान आणि सुरक्षित होणार आहे.
‘मुंबई वनटिकट’ म्हणजे काय?
‘मुंबई वनटिकट’ हे एक डिजिटल ट्रॅव्हल अॅप आहे, जे मुंबई मेट्रो, मोनोरेल, लोकल ट्रेन, नवी मुंबई मेट्रो आणि बेस्ट, ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली वाहतूक सेवा अशा विविध सार्वजनिक वाहतुकीला एकत्र आणते. प्रवासी एका QR कोड तिकिटाद्वारे या सर्व माध्यमांमध्ये प्रवास करू शकतील.
हेही वाचा - मोठे व्यवहार करण्यासाठी आता ‘फेस ऑथेंटिकेशन’ अनिवार्य ; NPCI कडून नवा नियम
अॅप वापरण्याची प्रक्रिया -
Google Play Store किंवा Apple App Store वरून Mumbai One Ticket App डाउनलोड करा.
मोबाइल नंबर वापरून साइन अप करा.
स्रोत आणि गंतव्य स्थानक निवडा.
तिकीटांची संख्या निवडा (एका वेळी 4 पर्यंत तिकिटे).
UPI, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरून पेमेंट करा.
मिळालेला QR कोड मेट्रो किंवा बस गेटवर स्कॅन करा आणि प्रवास सुरू करा.
हेही वाचा - Cough Syrup Ban: सरकारच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष; 2 वर्षांपूर्वी बंदी घातलेल्या कफ सिरप फॉर्म्युलामुळे 16 हून अधिक चिमुरड्यांचा मृत्यू
अॅपची खास वैशिष्ट्ये -
या अॅपमध्ये फक्त तिकीट बुकिंग नाही, तर रिअल-टाइम अपडेट्स, ट्रॅफिक माहिती, पर्यायी मार्ग, तसेच जवळच्या स्थानकांचे मॅपिंग यांसारखी फीचर्स उपलब्ध आहेत. याशिवाय SOS सुरक्षा प्रणाली देखील समाविष्ट असून आपत्कालीन प्रसंगी तत्काळ मदतीचा सिग्नल पाठवता येतो.
मुंबई मेट्रो लाईन 3 चे उद्घाटन
या सोहळ्यात पंतप्रधान मोदींनी मुंबई मेट्रो लाईन 3 (आचार्य अत्रे चौक – कफ परेड) चा फेज 2B ला हिरवा कंदिल दाखवला. 33.5 किलोमीटर लांबीची ही भूमिगत लाईन 27 स्थानकांसह दररोज 1.3 दशलक्ष प्रवाशांना सेवा देईल. ही लाईन आरबीआय, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि मंत्रालयासारख्या दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या कार्यालयांना थेट जोडेल.
अॅपचे महत्त्व
मुंबईत विविध वाहतूक ऑपरेटर्समुळे प्रवाशांना प्रत्येक प्रवासासाठी वेगवेगळे तिकिट घ्यावे लागत होते. ‘मुंबई वनटिकट’ अॅपमुळे आता ही सर्व प्रक्रिया डिजिटल आणि एकात्मिक झाली आहे. यामुळे वेळ, पैसा आणि कागदपत्रांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाचेल आणि प्रवास खऱ्या अर्थाने स्मार्ट बनेल.