रोहन कदम. प्रतिनिधी. पुणे: राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांनी 16 मे रोजी सासरच्या लोकांकडून हुंड्यासाठी छळ होत असल्याने आत्महत्या केली. अशातच, वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि वैष्णवीचे दीर सुशील हगवणे यांची पोलीस कोठडी 31 मे रोजी संपणार आहे. शनिवारी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या पिता-पुत्राला पुण्यातील जिल्हा सत्र न्यायालयात हजर करणार आहेत. दरम्यान, राजेंद्र आणि सुशील यांना आणखी पोलीस कोठडी मागितली जाणार की दोघांनाही न्यायालयीन कोठडीत पाठवले जाणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे. तसेच, पोलीस कोठडी मागताना रिमांड रिपोर्टमध्ये बावधन पोलीस नेमके काय सादर करणार हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे.
हेही वाचा: आरोपी निलेश चव्हाणला पु्ण्यात आणलं; आज न्यायालयात करणार हजर
सासरे राजेंद्र हगवणे, सासू, पती, दीर आणि नणंद यांनी हुंड्यासाठी वैष्णवीवर अमानुष छळ केल्याचा आरोप आहे. प्रेम विवाहादरम्यान, राजेंद्र हगवणे कुटुंबीयांनी वैष्णवीच्या माहेरकडून लग्नासाठी 51 तोळे सोने घेतले होते. त्यासोबतच फॉर्च्युनर गाडी, 7 किलो वजनाची चांदीची ताटं, भांडी, महिन्यात जावयाला सोन्याची अंगठी, वैष्णवीच्या नवऱ्याला दीड लाखांचा मोबाईल गिफ्ट दिला गेला. माहेरी आल्यावर प्रत्येक वेळी 50 हजार ते 1 लाख रुपये दिले जात होते. मात्र, जमीन खरेदीसाठी 2 कोटींची मागणी माहेरकडून पूर्ण न झाल्यामुळे वैष्णवीला छळ करण्यात आला. ज्यामुळे तिने राहत्या घरी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. तसेच, पती शशांक वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. हगवणे कुटुंबीयांनी वैष्णवीला प्रचंड शारीरिक आणि मानसिक छळ केल्यामुळे वैष्णवीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.
हेही वाचा: ठरलं तर मग; वैष्णवीची आई स्वाती कस्पटे करणार बाळाचं संगोपन