दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री अचानक दिल्ली गाठल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी दिल्ली गाठल्याने महायुतीत कोणत्या गोष्टी घडणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.
राज्यात सध्या शिंदे गट आणि भाजपमध्ये निधी वाटप, स्थानिक नेतृत्वातील समन्वय आणि भू-राजकीय तणावामुळे कुरबुरी वाढल्या आहेत. ठाणेसह अनेक ठिकाणी नाराजगी उघडपणे दिसून येत आहे. त्यात नव्याने भाजपमध्ये वाढलेले ‘इनकमिंग’ आणि शिंदे गटासह अजित पवार गटातील जुन्या जाणा-यांमध्ये निर्माण झालेली नाराजी यामुळे वातावरण अधिक संवेदनशील झाले आहे.
हेही वाचा: IRCTC Down: आयआरसीटीसीची वेबसाइट पुन्हा डाउन! तिकिट बुकिंग करताना लाखो प्रवाशांना करावा लागतोय अडचणींचा सामना
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावर असताना महायुतीतील अंतर्गत तणाव हा मोठा राजकीय मुद्दा बनला आहे. अनेक भाजप नेत्यांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे दिल्लीतील बैठकीत जागावाटप, रणनीती आणि नाराज कार्यकर्त्यांना गळाला घालण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकनाथ शिंदे दिल्लीत आल्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी ते थांबले. त्यानंतर ते वरिष्ठ केंद्रीय नेतृत्वाच्या भेटीगाठींसाठी रवाना झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत ते राज्यातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिंदे आज सकाळी मोदींच्या भेटीसाठी निघाल्याची माहितीही समोर आली आहे.
यापूर्वीही शिंदे यांनी निर्णायक राजकीय टप्प्यांवर अनेकदा दिल्ली गाठून शाह-मोदी यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे त्यांच्या या तातडीच्या दौऱ्यातून पुन्हा एकदा महायुतीच्या समीकरणांमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची दाट शक्यता राजकीय तज्ञ व्यक्त करत आहेत.
हेही वाचा: Nitin Gadkari On BJP: नागपूरात केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले “घरकी मुर्गी दाल बराबर नको!”, "जुने कार्यकर्ते पण सांभाळा" म्हणत भाजपाला दिला घरचा आहेर