मुंबई : पवईतील चर्चित ओलिसनाट्य प्रकरणानंतर आता गुन्हे शाखेने तपासाची गती वाढवली आहे. रोहित आर्या याच्याशी संपर्कात असलेल्या सर्व व्यक्तींची आणि गेल्या काही दिवसांत आर. ए. स्टुडिओला भेट दिलेल्या कलाकारांची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. या घटनेचा न्यायालयीन तपास होणार असल्याने, प्रत्येक पुरावा आणि साक्ष बारकाईने तपासला जात आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. ही धक्कादायक घटना पवईतील महावीर क्लासिक इमारतीतील आर. ए. स्टुडिओमध्ये घडली होती, जिथे रोहित आर्या याने तब्बल 20 लोकांना ओलीस ठेवले होते. यामध्ये बहुतांश लहान मुले होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी स्टुडिओत प्रवेश केला, तेव्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी स्वरक्षणार्थ गोळी झाडली. छातीत गोळी लागल्याने रोहितचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून तपासाची जबाबदारी गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आली आहे.
गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “गेल्या चार-पाच दिवसांत आर. ए. स्टुडिओत कोण कोण आले होते, कोणाशी रोहितचा संपर्क झाला होता, याचा संपूर्ण तपास केला जात आहे.” या यादीत मराठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांचा समावेश असून, त्यांना चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेते गिरीश ओक यांनी त्या काळात स्टुडिओला भेट दिली होती. त्याचप्रमाणे, रुचिता जाधव आणि काही इतर कलाकारांशीही रोहितचा संपर्क झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसेच आणखीन एका प्रसिद्ध अभिनेत्रीनेही रोहितची भेट घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हेही वाचा: Ranjitsinh Naik Nimbalkar: रणजितसिंह निंबाळकरांचा दुग्धाभिषेक, कार्यकर्त्यांसमोर ढसाढसा रडले; साताऱ्यातील जाहीर पत्रकार परिषदेत काय घडलं?
या प्रकरणात गोळी झाडणारे सहाय्यक निरीक्षक अमोल वाघमारे यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी स्टुडिओ मालक, कर्मचारी आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब घेण्यास सुरुवात केली आहे. ओलीस ठेवण्यात आलेल्या मुलांच्या पालकांचेही सविस्तर जबाब नोंदवले जाणार असल्याचे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. घटनेच्या दिवशी मुलांच्या सुटकेसाठी पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे आणि वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांनी रोहितशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र रोहित संतापलेल्या अवस्थेत होता आणि त्याने “मला तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशीच मला संवाद साधायचा आहे” अशी मागणी केली होती. पोलिसांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि केसरकर यांच्याशी संपर्क साधला, पण केसरकर यांनी रोहित सोबत संभाषण करण्यास टाळले, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
दरम्यान, या प्रकरणात वारंवार केसरकर यांचे नाव घेतले गेल्यामुळे त्यांच्याही चौकशीची शक्यता निर्माण झाली आहे. पोलिसांनी स्पष्ट केलं की, “संपूर्ण घटनेचं सत्य समोर आणण्यासाठी प्रत्येक अंगाने तपास सुरू आहे आणि कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याआधी सर्व पुरावे तपासले जातील.” या संपूर्ण घटनेमुळे पवईतील नागरिक आणि मनोरंजन क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. गुन्हे शाखा आता प्रत्येक धागा जोडून या रक्तरंजित नाट्याच्या मागील खरी कारणं आणि उद्देश उघड करण्याच्या तयारीत आहे.
हेही वाचा: Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी ! आजपासून खात्यात जमा होणार पैसे पण...