छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महापालिकेने एक विचित्र नियम लागू केला आहे. कोणत्याही झोन कार्यालयातून बर्थ सर्टिफिकेट (जन्म प्रमाणपत्र) काढायचे असल्यास, अर्जासोबत मालमत्ता कर भरल्याची पावती जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नव्या अटीमुळे अनेक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
विशेषतः भाडेकरूंसाठी ही अट मोठी अडचण बनली आहे. घरमालक मालमत्ता कर भरायला तयार नसतो, किंवा भरला तरी "हे माझे भाडेकरू आहेत" असे अधिकृतरित्या लिहून द्यायला तयार नसतो. परिणामी, भाडेकरूंना जन्म प्रमाणपत्र मिळवताना अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे.
हेही वाचा: महसूल प्रशासनातील लाचखोरीची मालिका; महिनाभरात पाच अधिकाऱ्यांवर कारवाई
या नव्या अटीमुळे झोन कार्यालयांमध्ये बर्थ सर्टिफिकेट काढायला येणाऱ्या नागरिकांची संख्या जवळपास 50 टक्क्यांनी घटली आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2024 या वर्षात छत्रपती संभाजीनगर शहरात 30,000 पेक्षा अधिक बालकांचा जन्म झाला आहे. यातील फक्त 13,900 पालकांनीच जन्म प्रमाणपत्र घेतले आहे. उर्वरित पालक गरज भासल्यास नंतर जन्म प्रमाणपत्रासाठी येतात.
मात्र, मागील दीड महिन्यापासून महापालिकेने असा आदेश काढला आहे की, अर्जासोबत मालमत्ता कर भरल्याची पावती सादर करावी लागेल. यामुळे अनेक सामान्य नागरिक, विशेषतः भाड्याच्या घरात राहणारे, शासकीय कागदपत्र मिळवताना अडचणीत आले आहेत.
हा नियम लागू करताना मालमत्ता नसलेल्यांचा विचार केला गेला नाही, ही बाब विशेष लक्षवेधी ठरते. घरमालकाची जबाबदारी भाडेकरूंवर ढकलल्यामुळे अनेकांना मुलांचे जन्म प्रमाणपत्र मिळवणे कठीण झाले आहे. या नव्या अटीवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.