बारामती शहरातील भिगवण रोड येथील एका इमारतीत राहणाऱ्या 16 वर्षीय विद्यार्थिनीने आज (4 सप्टेंबर 2026) जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील टेरेसवरून उडी मारून तिने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या विद्यार्थिनीला तातडीने उपचारासाठी बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान पहाटेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.
मृत विद्यार्थिनी इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती. सध्या तिच्या परीक्षा सुरू असल्याने ती परीक्षेच्या तणावाखाली असल्याची प्राथमिक माहिती तिच्या पालकांनी पोलिसांना दिली आहे. त्यामुळे परीक्षेच्या तणावातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बारामती शहर पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी, सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल माहिती तसेच संबंधित व्यक्तींचे जबाब घेऊन पुढील तपास सुरू आहे.
अशा घटना टाळण्यासाठी शिक्षक आणि पालकांनी विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांवरील अभ्यास, परीक्षा आणि इतर ताण समजून घेण्यासोबतच सोशल मीडियाचा त्यांच्या मानसिकतेवर किती आणि कसा परिणाम होत आहे, याकडेही गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. कोणत्याही अडचणीसमोर जीवन संपवणे हा पर्याय नाही. तर विद्यार्थ्यांनी अडचणीच्या काळात पालक, शिक्षक किंवा विश्वासू व्यक्तींशी संवाद साधणे महत्त्वाचे आहे.