Friday, June 12, 2026 11:48:10 PM

Attack On Vikas Lavande: 'पिस्तूल रोखलं, शाई फेकली अन्...'; राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडे यांच्यावर पुण्यात जीवघेणा हल्ला; नेमकं काय घडलं?

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर पुण्यात शाईफेक करत जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.

attack on vikas lavande पिस्तूल रोखलं शाई फेकली अन् राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडे यांच्यावर पुण्यात जीवघेणा हल्ला नेमकं काय घडलं

पुणे: महाराष्ट्राची ओळख ही संतांची आणि पुरोगामी विचारांची भूमी म्हणून आहे. मात्र, अलीकडच्या काळात वैचारिक मतभेदांची जागा आता गुंडगिरीने घेतली की काय, असा संतप्त सवाल उपस्थित करणारी एक धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर भरदिवसा जीवघेणा हल्ला करत शाईफेक करण्यात आली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत.

ही घटना आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. विकास लवांडे हे आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथे त्यांचे प्रवचन संपवून परतत होते. त्यावेळी तीन चारचाकी वाहनांमधून आलेल्या संग्राम भंडारे आणि त्यांच्यासोबतच्या 10 ते 15 तथाकथित गोरक्षकांनी लवांडे यांची गाडी अडवली. कोणतीही पूर्वकल्पना नसताना या जमावाने लवांडे यांना धक्काबुक्की करत त्यांच्या अंगावर शाई ओतली. एवढ्यावरच न थांबता, दहशत निर्माण करण्यासाठी या गुंडांनी थेट पिस्तूलही रोखल्याचा खळबळजनक दावा खुद्द लवांडे यांनी केला आहे. हल्ला केल्यानंतर हे सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

या घटनेनंतर संतप्त झालेल्या विकास लवांडे यांनी थेट लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठले. हल्ल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. या पोस्टमध्ये त्यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत हल्ला करणाऱ्यांचा निषेध केला आहे. "संग्राम भंडारे हा वारकऱ्यांमधील नथुराम गोडसे आहे," अशी जळजळीत टीका करत पुणे पोलीस आयुक्तांनी या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी त्यांनी केली. जोपर्यंत हल्लेखोरांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत लोणी काळभोर पोलीस ठाण्यातच सत्याग्रह करणार असल्याची ठाम भूमिका लवांडे यांनी घेतली. या घटनेची माहिती जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित यांनी दिली आहे. 

हेही वाचा: Dhule NCP Crisis : धुळ्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का! माजी आमदारासह 8 नगरसेवकांचा राजीनामा?

दुसरीकडे, या हल्ल्याला राजकीय आणि सांप्रदायिक रंगही प्राप्त झाला आहे. आचार्य तुषार भोसले यांनी या घटनेचे एकप्रकारे समर्थन करत राष्ट्रवादीलाच लक्ष केले आहे. भोसले यांच्या मते, विकास लवांडे हे गेल्या काही दिवसांपासून वारकरी संप्रदायाचा पाया रचणाऱ्या महान संतांचा अत्यंत खालच्या भाषेत अपमान करत होते. त्यांना 'घुसखोर' संबोधून लवांडे यांनी लाखो वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. या संतापाच्या उद्रेकातूनच हा प्रकार घडल्याचे सांगत, भोसले यांनी शरद पवार यांना थेट आव्हान दिले आहे. "पवारांनी आता तरी त्यांच्या नेत्यांना आवरावे आणि संतांचा अपमान थांबवावा," असा इशारा भोसले यांनी दिला.

या सर्व प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत रोहित पवार म्हणाले की, "वारकरी संप्रदायात शिरलेल्या कट्टरतावाद्यांविरोधात लवांडे पुराव्यांसह बोलत होते, म्हणूनच त्यांच्यावर हा भ्याड हल्ला झाला. मात्र, अशा हल्ल्यांना आम्ही भीक घालणार नाही. पूर्वी ज्ञानोबा-तुकोबांनाही अशाच मनुवादी वृत्तीने छळले होते."

राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत का? असा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. रोहित पवार यांनी राज्य सरकारला धारेवर धरत हल्लेखोरांच्या तत्काळ अटकेची आणि लवांडे यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. "जर लवांडे यांना काही झाले, तर त्याला सर्वस्वी सत्तेच्या आशीर्वादाने पोसलेले हे सरकारच जबाबदार असेल," असा सज्जड दमही त्यांनी दिला आहे. एकूणच, या शाईफेकीच्या घटनेने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर एक नवा वाद निर्माण केला असून, पोलीस या प्रकरणी काय कारवाई करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा: Suvendu Adhikari Networth: स्वत:च्या नावे कार नाही,सोनं नाही आणि हातात फक्त 12000 रूपये कॅश; बंगालच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणाऱ्या सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती?

 


सम्बन्धित सामग्री