पुणे: शहराच्या कोंढवा परिसरात एका सुरक्षित मानल्या जाणाऱ्या उच्चभ्रू सोसायटीत 25 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपीने बनावट कुरिअर बॉय असल्याचे भासवत सोसायटीमध्ये प्रवेश केला आणि सुरक्षिततेच्या सर्व मर्यादा भेदून हा गुन्हा केला.
प्राथमिक माहितीनुसार, ही घटना बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. पीडित तरुणी आपल्या भावासोबत या सोसायटीत राहत होती. ती मूळची अकोल्याची असून पुण्यातील एका खासगी आयटी कंपनीत काम करते. आरोपीने कुरिअर असल्याचे सांगत पीडितेच्या फ्लॅटचा दरवाजा ठोठावला. त्याने 'बँकेचं महत्वाचं कुरिअर आहे' असे सांगितल्यावर, पीडितेने ते आपले नसल्याचे स्पष्ट केले. मात्र आरोपीने 'सही करावी लागेल' असा आग्रह धरल्याने पीडित तरुणीने सेफ्टी डोअर उघडला.
त्या क्षणीच आरोपीने तिच्या तोंडावर केमिकल स्प्रे मारला, ज्यामुळे ती काही क्षणातच बेशुद्ध झाली. त्यानंतर त्याने तिच्यावर जबरदस्ती केली व घराबाहेर पळून गेला. हा सर्व प्रकार काही मिनिटांत घडल्याने सोसायटीतील कोणीही काही लक्षात घेऊ शकले नाही.या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला. पोलिसांनी सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी ताब्यात घेतले असून आरोपीने कोणत्या गेटमधून प्रवेश केला, त्यावेळी सोसायटीतील सुरक्षा व्यवस्थेचा तपशीलवार आढावा घेतला जात आहे.
हेही वाचा: दिशा सालियान प्रकरणात पोलिसांकडून कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर; 'दिशाच्या हत्येशी आदित्य ठाकरेंचा ...
पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी सांगितले की, 'आरोपीचा शोध घेण्यासाठी 10 वेगवेगळ्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आरोपी कोणत्याही हालचालीपूर्वी सापडावा, यासाठी सीसीटीव्ही, कॉल डिटेल्स आणि तांत्रिक पुराव्यांचा आधार घेतला जात आहे.'
ही घटना सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे. गार्डेड सोसायटीतील अशी घटना घडणे, आणि आरोपीचा सहज प्रवेश होणे हे सुरक्षेतील मोठे अपयश मानले जात आहे. या प्रकारामुळे शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.