Friday, February 13, 2026 10:23:08 AM

Pune Hit And Run Case: पुण्यात पुन्हा हिट अँड रनचा थरार! बिग बॉसच्या माजी स्पर्धकाच्या आईला कारची जोरदार धडक; घटनेचा धक्कादायक CCTV समोर

पुण्यातील पेट्रोल पंपावर कारने धडक देऊन पलायन केल्याने तहसीन पूनावालांच्या आईचा पाय फ्रॅक्चर झाला. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल असून पोलिस तपासाची प्रक्रिया सुरू होणार आहे.

pune hit and run case पुण्यात पुन्हा हिट अँड रनचा थरार बिग बॉसच्या माजी स्पर्धकाच्या आईला कारची जोरदार धडक घटनेचा धक्कादायक cctv समोर

Pune Hit And Run Case: पुण्यातील एका पेट्रोल पंपावर घडलेल्या धक्कादायक हिट-अँड-रन घटनेमुळे खळबळ उडाली आहे. राजकीय विश्लेषक तहसीन पूनावालांच्या आईला एका कारने धडक दिल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या अपघातात त्यांना पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चर्चेला वेग आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तहसीन पूनावालांची आई पेट्रोल पंपावर उभी असताना काही अंतरावर असलेली एक कार अचानक रिव्हर्स घेत त्यांच्या दिशेने आली आणि तिने त्यांना धडक दिली. अपघातानंतर परिसरातील लोकांनी तत्काळ धाव घेऊन त्यांना मदत केली. या घटनेत त्यांचा पाय फ्रॅक्चर झाल्याचे समोर आले आहे. संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचे फुटेज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.

हेही वाचा:Online Shopping Fraud: स्वस्त साडीचा मोह आणि हजारोंचा फटका! इंस्टाग्रामवरील बनावट फॅशन पेजमुळे तरुणीची फसवणूक

या घटनेनंतर तहसीन पूनावालांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (माजी ट्विटर) संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज शेअर करत हा प्रकार अपघात नसून जाणीवपूर्वक केला असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, कार आणि त्यांच्या आईमधील अंतर पाहता हा प्रकार संशयास्पद वाटतो. “जर हे जाणूनबुजून केलं असेल, तर दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.

पूनावालांनी केलेल्या पोस्टमध्ये घटनेबद्दल तीव्र शब्दांत संताप व्यक्त झाला असून त्यामुळे सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही युजर्सनी त्यांच्या भावनिक प्रतिक्रियेबद्दल सहानुभूती दर्शवली, तर काहींनी कायदेशीर मार्गाने न्याय मिळवण्याचा सल्ला दिला.

दरम्यान, या प्रकरणी लवकरच पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला जाण्याची शक्यता आहे. संबंधित वाहनचालकाने अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढल्याचे फुटेजमध्ये दिसून येते. त्यामुळे हा हिट-अँड-रनचा प्रकार असल्याचे प्राथमिकदृष्ट्या स्पष्ट होत आहे.

हेही वाचा: Crime News: तब्बल 9 वर्षांचे प्रेम; घरच्यांच्या संमतीने लग्न, पण अवघ्या 2 महिन्यांत बायकोने नवऱ्याला गळा दाबून संपवलं

अपघातावेळी वाहनचालक मद्यधुंद होता की अन्य कोणत्या कारणामुळे नियंत्रण सुटले, याचाही तपास केला जाणार आहे. पुण्यासारख्या शहरात पेट्रोल पंपासारख्या गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडणे गंभीर बाब मानली जात आहे.

या घटनेमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दाही पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सार्वजनिक ठिकाणी वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे निरपराध नागरिकांना कसा फटका बसतो, याचं हे उदाहरण असल्याचं अनेकांचे म्हणणे आहे. आता या प्रकरणात पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचं लक्ष लागलं असून दोषींवर कठोर कारवाई होणार का, याकडे पुणेकरांसह संपूर्ण राज्याचं लक्ष आहे.


सम्बन्धित सामग्री