पुण्यातील ऐतिहासिक जैन बोर्डिंग हाऊस संदर्भात धर्मादाय आयुक्तांनी एक निर्णायक आदेश देत परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. म्हणजेच या जागेची विक्री आता पुढील आदेश येईपर्यंत थांबवण्यात आली आहे. जैन समाजासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या या प्रकरणात समाजाच्या भावना आणि वाढता विरोध लक्षात घेऊन धर्मादाय आयुक्त अमोघ कलोटी यांनी हा निर्णय दिला. मुंबई येथे झालेल्या या तातडीच्या सुनावणीत जैन समाजाच्या वतीने ॲड. योगेश पांडे यांनी प्रभावी मांडणी केली. सुनावणीदरम्यान समाजाचे प्रमुख प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया, अक्षय जैन आणि इतर अनेक जैन बांधव उपस्थित होते.
या सुनावणीवर संपूर्ण जैन समाजाचे लक्ष केंद्रीत झाले होते. जैन बोर्डिंगच्या जमिनीच्या विक्रीविरोधातील हा संघर्षाचा पहिला मोठा टप्पा मानला जातो. धर्मादाय आयुक्तांच्या ‘स्टेटस्को’ निर्णयामुळे सध्या या जमिनीवर कोणताही व्यवहार होऊ शकत नाही. 1958 साली हिराचंद नेमचंद दोषी यांच्या योगदानातून पुण्यातील शिवाजीनगर येथे या वसतिगृहाची स्थापना करण्यात आली होती. ट्रस्टकडून विकासकामाच्या नावाखाली या जागेचा पुनर्विकास करण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, समाजातील अनेक सदस्यांनी या योजनेला ठाम विरोध दर्शवला होता. काही महिन्यांपूर्वी जागा विक्रीसंबंधी व्यवहार झाल्याचा आरोप झाल्यानंतर मोठं जनआंदोलन उभं राहिलं.
हेही वाचा : Maharashtra Weather Update: ऐन दिवाळीत चक्रीवादळाचा धोका, 21 ऑक्टोबरपासून कोणत्या भागांना बसणार फटका?
या प्रकरणात धर्मादाय आयुक्तालयाकडून नियमांचे उल्लंघन करून मंजुरी दिल्याचा आरोप देखील झाला. या वादात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याही नावाचा उल्लेख झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.
सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत खाबिया यांनी सांगितले, “जैन समाज नेहमीच शांततेचा आणि अहिंसेचा मार्ग स्वीकारतो. देवेंद्र फडणवीस यांनी समाजाचे म्हणणे ऐकून घेतले आणि न्याय मिळेल, अन्याय होऊ देणार नाही असा शब्द दिला. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नाही, आमची एकच मागणी आहे. बोर्डिंग, मंदिर आणि जैन समाजाची जमीन ही त्यांच्या मालकीचीच राहिली पाहिजे.”
या सुनावणीदरम्यान ॲड. योगेश पांडे यांनी मंदिराच्या अस्तित्वाचे फोटो, नकाशे आणि पुरावे सादर केले. त्यांनी सांगितले की, “ट्रस्टकडून धर्मादाय आयुक्तांची दिशाभूल करण्यात आली आहे. विक्री व्यवहारात मंदिराचा उल्लेख नाही, मात्र त्या जागेवर प्रत्यक्ष मंदिर आहे. पुढील सुनावणी 28 ऑक्टोबरला होणार असून त्यात मंदिराच्या अस्तित्वाबाबतचा अधिकृत अहवाल सादर केला जाणार आहे.”
ते पुढे म्हणाले, “या ठिकाणी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ भेट देऊन गेले होते याचे फोटो आणि कागदपत्रे आमच्याकडे आहेत. संपूर्ण व्यवहारात अनेक तथ्ये लपवण्यात आली आहेत. जैन समाज आपली भूमी, धर्मस्थळ आणि परंपरा वाचवण्यासाठी शेवटपर्यंत लढणार आहे.”
हेही वाचा : Diwali Special Train Pune-Nanded: दिवाळीनिमित्त प्रवाशांना दिलासा! पुणे–नांदेडदरम्यान विशेष रेल्वे सुरू; मराठवाड्याच्या नागरिकांसाठी आनंदवार्ता